सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेला देशभर जोरदार प्रतिसाद मिळत असून, भारतीय जनता स्वयंस्फुर्तीने या पदयात्रेत सहभागी होत आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत असून, १६ नोव्हेंबरला अकोला तर १८ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी सिंदखेडराजा तालुका व शहर आणि देऊळगावराजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ बैठकीचे शुक्रवारी, दि.४ नोव्हेंबररोजी देऊळगावराजा येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्वच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, व सर्वच आजी-माजी तालुक्यातील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन हजर रहावे, असे आवाहन सिंदखेडराजा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी केलेले आहे.
ही बैठक शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजता योगीराज लॉन, सिनगाव फाटा चिखली रोड, देऊळगाव राजा येथे होणार असून, कार्यक्रम स्थळी जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे. सामान्य नागरिकांनासुद्धा पदयात्रेत सहभागी व्हायचे असल्यास बैठकीला उपस्थिती रहावे, असेदेखील आवाहन मनोज देवानंद कायंदे, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रा.दिलीप सनाप, अध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी, देऊळगाव राजा, शिवदास रिंढे, अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदखेड राजा, रफिक शेख, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, देऊळगाव राजा, आतिश कासारे, कार्याध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, देऊळगाव राजा, सिद्धार्थ जाधव, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, सिंदखेड राजा, दीपक जगणराव ठाकरे, अध्यक्ष, सिंदखेड राजा विधानसभा युवक काँग्रेस आदींनी केलेले आहे.
असा राहणार यात्रेचा मार्ग
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबररोजी दाखल होत असून, १६ नोव्हेंबर रोजी रात्री पातूर तालुक्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून यात्रा बाळापूरकडे रवाना होईल. दुपारी ३.३० वाजता हिंगणा उजाडे व त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी यात्रा कुपटा येथील जि.प. शाळेतून बुलडाणा जिल्ह्यात रवाना होणार आहे. शेगाव येथे खा. राहुल गांधी यांची सभा होणार असून, सभेला हजर राहण्याचे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केलेले आहे.
———————–