स्प्रिंकलर, केबलच नव्हे तर खुराड्यातून काेंबड्याही लांबविल्या!
मेहकर (रवींद्र सुरूशे) – तालुक्यातील देऊळगाव माळी परिसरात भुरटे चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, या चोरट्यांना पोलिसांचा धाक वाटेनासा झाला आहे. हे भुरटे शेतकर्यांचे गोठे फोडत असून, स्प्रिंकलर, केबल, मोटारी इतकेच नाही तर कोंबड्या आदी चोरून नेत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथे भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, दिनांक ३१ ऑक्टोबरच्या रात्रीला शेतातील गोठ्यांचे कुलूप फोडून स्प्रिंकलर, केबल व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या चोरट्यांनी सर्वप्रथम शेवगा जहागीर रोडवर असलेल्या भगवान अश्रू मगर यांच्या शेतातील खोलीचे कुलूप तोडून २२ स्प्रिंकलर मोडून नेले. त्यानंतर दुसरा मोर्चा दत्तात्रेय गवई सर यांच्या शेतात असलेल्या बोरवेलमधील मोटर वर काढून जवळपास साडेतीनशे फूट केबल तोडून तेथेच जाळून टाकून, त्यातील तांबे नेले.
त्यानंतर तिसरा मोर्चा हा ज्ञानेश्वर उद्धव सुरूशे यांच्या शेतात असलेल्या खोलीकडे वळवला. तेथून त्यांनी पाच ते सहा कोंबड्या, केबल बंडल, व स्प्रिंकलर चोरून नेले. सकाळी ही गोष्ट माहित झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्यानंतर मेहकर पोलीस स्टेशनचे बीट जामदार अशोक मस्के, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर रिंढे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शेतकर्यांनी दर्शविलेल्या अज्ञात संशयित चोरट्यांविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.