– संचेती यांच्यासह पुतण्या व चालक सुखरूप
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या इनोव्हा क्रिस्टा या वाहनाला दुपारी दोन वाजता बोथा घाटात एसटी बसने जोरदार धडक दिली. घाटातील एका वळणावर हा अपघात झाला. या अपघातात संचेती यांच्यासह त्यांचा पुतण्या व चालक हे तिघे बालंबाल बचावले आहेत. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, संचेती यांच्या चालकाला वळणावर अचानक समोरून आलेली बस न दिसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती हे अमरावती पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. आज ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेथे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्त्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते बुलढाण्याहून खामगावकडे बोथामार्गे निघाले. बोथा घाटातील एका वळणावर अचानक समोरून बस आल्याने चालक नीलेश राजपूत याचा गोंधळ उडाला. तरीही इनोव्हा क्रिस्टा हे वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, एसटी बसही वेगात असल्याने संचेती यांच्या वाहनाला समोरा समोर धडक बसली व वाहनाचे पुढच्या बाजूने मोठे नुकसान झाले.
वाहनातील एअर बॅग्स उघडल्याने व वाहनाचा वेग नियंत्रित झाल्याने संचेती यांच्यासह त्यांचा पुतण्या व चालक बालंबाल बचावले. या घटनेत एसटी बसचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर अन्य वाहनाने संचेती हे खामगावमार्गे अमरावतीकडे रवाना झाले असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.