मेरा बुद्रूक येथे ‘रात्रीस खेळ चाले’! भानामती, जादूटोणा करून परिसरात पसरवली जातेय दहशत!
– हिंदू स्मशानभूमी मेरा बुद्रूक येथील अघोरी प्रकार, गावकरी भयभीत!
मेरा बुद्रूक (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जग हे एकीकडे एकविसाव्या शतकात, यांत्रिक युगात, आधुनिक, वैज्ञानिक युगात जात असतानाच समाजातील काही लोक जादूटोणा, भानामती, करणी अशा प्रकारचे अघोरी खेळ करून अंधश्रद्धा पसरविण्याचे व काही त्याला बळी पडताना लोक दिसत आहेत. असाच प्रकार मेरा बुद्रुक येथील हिंदू स्मशानभूमीच्या समोर घडलेला आहे. त्यामुळे गावकरी भयभीत झाले असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्यांच्या पोलिसांनी तातडीने मुसक्या आवळव्यात अशी मागणी पुढे आली आहे.
दहा हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मेरा बुद्रुक गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सर्व क्षेत्रांमध्ये येथील लोक नावाजलेले आहेत. हिंदू स्मशानभूमी गावाच्या दक्षिणेस काही अंतरावर वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आहे. बर्याच दिवसापासून हा जादूटोणा व भानामतीचा खेळ सुरू आहे. रात्रीच्या वेळेस काही अज्ञात व्यक्ती हिंदू स्मशानभूमी समोर येऊन अघोरी पूजाअर्चाचा खेळ करताना दिसून येत आहे. पूजा करताना त्या ठिकाणी बरीच कापलेली लिंब, हळद, कुंकू, काही लिंबाला सर्व बाजूंनी टाचणी टोचलेल्या, तर काही कापडी पिशवीमध्ये वेगवेगळ्या धान्याचा उपयोग केलेला दिसतो. या अगोदरही कब्रस्तान जवळील मारूकाच्या झाडाला व हिंदू स्मशानभूमी शेजारील लिंबाच्या झाडाला काळ्या कपड्यांनी बनविलेली विचित्र प्रकारची बाहुली लोखंडी खिळ्यामध्ये झाडाला पुष्कळ ठिकाणी ठोकलेली होती. पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री हा जादूटोणा, भानामतीचा किंवा करणीचा खेळ खेळल्या जात आहे, की अन्य काही विचित्र प्रकारचा विधी केला जातो हे समजायला तयार नाही. बर्याच दिवसांच्या या आघोरी कृत्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तर्कवितर्क याला उधाण आले आहे, आणि अशा प्रकारामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
एकीकडे, मेरा बुद्रुक येथील हिंदू बांधवांनी दिवंगत सुधाकर दगडूजी पडघान यांच्या संकल्पनेतील स्वतःच्या स्वखर्चातून गावकर्यांनी नयनरम्य व सर्व सोयींनी युक्त अशी आधुनिक स्मशानभूमी होण्याची वाटचाल करीत आहे. आणि दुसरीकडे काही कथित जादूगार असले भयग्रस्त, अघोरी प्रकार करीत आहेत. असा जर हा प्रकार चालू राहिला तर या लोकांची आणखी हिम्मत वाढेल व नरबळी सारख्या घटनेची पुनरावृत्तीही होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. गावातील एखाद्या माणसाच्या अंत्यविधीच्या वेळेस किंवा सावडणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते व या गावांमध्ये असल्या प्रकारचे लोक राहतात याची नाहक बदनामी होताना दिसत आहे. असल्या अघोरी प्रकारामुळे हिंदू बांधवांच्या मनामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे व नाराजीसुद्धा व्यक्त केली जात आहे. याकडे आता गावकर्यांनी बारीक लक्ष ठेवून असले अघोरी, भीती निर्माण करणारे प्रकार करणार्या लोकांचा वेळीच बंदोबस्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्याची गरज आहे. ही निवळ अंधश्रद्धा व भीती लोकांच्या मनामध्ये पेरण्याचे व भोळ्या भाबड्या अनाडी, श्रद्धाळू लोकांना फसविण्याचा सर्रास प्रकार चालू आहे. याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी सर्व हिंदू बांधवाकडून मागणी होत आहे.