वर्धा (विशेष प्रतिनिधी) – पुलगाव, वर्धा, आर्वी, सेवाग्राम परिसरात दुचाकीने येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणार्या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. वर्ध्याच्या आर्वीनाका चौकात झुणकाभाकर केंद्र चालविणारा या टोळीचा म्होरक्या निघाला. पोलिसांनी अटक केलेल्यांत वर्ध्याच्या यशवंत कॉलनीत राहणार्या सतिश उर्फ सचिन अरुण अंबुलकर (वय२७), पुलगावच्या बरांडा परिसरात राहणार्या श्रुखंल ललित मडामे (वय २०) तसेच बोरगाव मेघे येथे राहणारा संकेत शरदराव कोराम (वय२२) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून ४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात विना क्रमांकाच्या पांंढर्या रंगाच्या मोपेडचाही समावेश आहे.
पुलगावच्या हरिरामनगरासह सेवाग्राम, वर्धा येथे या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. सतिश उर्फ सचिन अरुण अंबुलकर याच्या मालकीचे आर्वीनाका चौकात झुणका भाकर केंद्र असून, याच केंद्रात श्रुंखल मडामे काम करीत होता. त्यांनी दोघांनी सेवाग्राम परिसरातून सोनसाखळी पळविण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. तर संकेत कोराम याच्या मार्फत पळविलेल्या सोनसाखळीचे सोने गाळून ते पैसे मिळविण्याच्या तयारीत होते. संकेत कोराम याच्या ताब्यातून दोन लाख ९७ हजार ६४० रुपये किंमतीचे ७८ ग्रॅम ३२० मिलिग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे केली.