Breaking newsHead linesKOLHAPURPachhim Maharashtra

बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर उलटला, गळतीने अडिचशे मीटर परिसरात पसरला गॅस!

– मार्ग बंद, नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलवले!

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूर – रत्नागिरी या कायम रहदारीच्या मार्गावरील बोरपाडळे (ता. पन्हाळा) या गाववेश कमानीजवळ भोपतळी भागात रात्री जयगडहून नागपूरकडे जाणारा गॅस टँकर पलटी झाला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी टँकरची गॅसटाकी लिकेज होऊन गॅस गळती चालू झाल्याने प्रशासनासह सर्वांची तारांबळ उडाली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. आजूबाजूचा तीन किलोमीटरचा परिसरदेखील निर्मनुष्य करण्यात आला होता. सध्या २५० मीटर परिसरात गॅस पसरला असल्याचे जिल्हा आपत्ती अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी सांगितले. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. कोडोली पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनचे जवान यांचा कडक पहारा देत आहेत.

बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस टँकरचा अपघात होऊन तो पलटी झाला. त्यामुळे टँकरची गॅसटाकी लिकेज झाली. त्यामधून गॅस गळती चालू होती. त्यामुळे वाठार ते कोडोली ते बोरपाडळे, पुढे बोरपाडळे फाटा हा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आला होता. तसेच बोरपाडळे गाव परिसरात प्रवास करणे टाळावे, अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. डोईजड यांनी केले आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी याठिकाणी तहसीलदार रमेश शेडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिका कोल्हापूरचे दस्तगीर मुल्ला आणि शीतलकुमार डोईजड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोडोली पोलीस स्टेशन आदी अधिकारी रात्रभर याठिकाणी थांबून आहेत. सदर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना हलवण्यात आले आहे. याठिकाणी यापूर्वीही असे गॅस टँकरचे अपघात झाले असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!