पुणे (युनूस खतीब) – वृत्तपत्रातून बदनामी करण्याची तसेच खुनाची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी उकळणार्या एका महिला संपादकासह सहा तोतया पत्रकारांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्षमणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच योगेश नागपुरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका गोदामात २३ ऑक्टोबररोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला. याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे. प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर हे थांबले होते. प्रमोद साळुंखे याने एका इंग्रजी वृत्तपत्राचा व आत्मज्योती पेपरचा पत्रकार असल्याचे सांगितले. तुमच्या गोदामात भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करून दोन नंबरचा धंदा करता, गुटख्याचीही विक्री केली, अशी बातमी छापून तुमची बदनामी करतो. पैसे दिले नाही तर खानदानाचा खूनच करून टाकतो, असे म्हणून धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीने मुंढवा पोलिसांत तक्रार दाखल केली. तोतया पत्रकाराने फिर्यादीच्या मुलालाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल करून मुंढवा पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या व सहापैकी चौघांना अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे हे करत आहेत.
दरम्यान, ही घटना बनावट असल्याचा संशय पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त होत आहे. प्रमोद साळुंखे हे जबाबदार पत्रकार असून, त्यांनी अन्न भेसळीच्या अनेक बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना अडकविण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले असावे, असा संशय निर्माण होतो आहे. याप्रकरणी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
—————-