चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंत्री कोळी गावावर काल रात्रीच्या सुमारास तसेच, गेल्या चार ते पाच दिवसांपासून अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गावाची टेहाळणी केली, की कुणी तरी खोडसाळपणा चालवला आहे, याबाबत ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा होत आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
अंत्री कोळी गावामध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या गेल्या ४ ते ५ दिवसांपासून गावातील वेगवेगळ्या भागात रात्री ८ ते ९ वाजेच्यानंतर तर कधी कधी मध्यरात्रीच्या सुमारास घिरट्या घालताना दिसत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून दरोडेखोर चोरीसाठी टेहाळणी तर करत नाही ना? असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलीसांनी तातडीने लक्ष घालून बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कालदेखील गावात अशाच पद्धतीचे ड्रोन घिरट्या घालत होते. त्यावेळी गावातील तरुणांनी या ड्रोनचा काही वेळ पाठलाग केला. परंतु ड्रोन हाती आले नाही ते वारंवार गावावरती घिरट्या का घालतात, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. अफवा मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील नागरिक रात्र जागून काढत आहेत. या ड्रोनची माहिती गावाचे उपसरपंच यांनी स्थानिक रायपूर पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे कळवली आहे.