बाहेरील लादलेला उमेदवार स्वीकारण्यास सिंदखेडराजा मतदारसंघातून तीव्र नकारघंटा!
– बाहेरचा उमेदवार नको, महाविकास आघाडीच्या नेत्यांची ठरावाद्वारे पक्षश्रेष्ठींकडे मागणी
– ‘महायुती’तूनही बाहेरील उमेदवार स्वीकारण्यास नापसंती!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व गाठीभेटी वाढल्या आहेत. कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे निश्चित नसले तरी, महाविकास आघाडीच्यावतीने निष्ठावान कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली असून, निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव घेण्यात आला आहे. बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, मतदारांचीदेखील बाहेरील लादलेला उमेदवार स्वीकारण्याची मानसिकता दिसत नाही. महायुतीतूनही बाहेरील उमेदवार स्वीकारण्याची तयारी दिसत नसून, लादेलला उमेदवार या मतदारसंघात चालणार नाही, असा सार्वत्रिक सूर आहे. त्यामुळे शिंदे गटाचे योगेश जाधव, वसंतराव मगर, आणि संभाव्यतः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची चांगलीच राजकीय गोची झाली आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता व नेता गावभेटी घेऊन आपण कसे योग्य आहोत, याचा आरसा दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मागण्यांसाठी योगेश जाधव, वसंतराव मगर, गायत्रीताई शिंगणे, दिनेश गिते यांनी पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर शरद पवार हे आमचे दैवत असून, त्यांनीच आम्हाला राजकारणाची दिशा देण्याचे काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे भावनिक उद्गार काढून विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपलाही मार्ग मोकळा असल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले आहे. डॉ.सुनील कायंदे आणि अभय चव्हाण यांनाही पक्षाने ऑफर दिल्याचे समजते. परंतु, तूर्तास त्यांनी पक्ष बदल करण्यास नकार दिल्याचे समजते. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून दिलीप वाघ यांनी प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत दिलीप वाघ कोठे होते, याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, दादाराव खार्डे, महेंद्र पाटील, बंद्री बोडखे तर काँग्रेस पक्षाचे माजी सभापती अशोक पडघान, मनोज कायंदे अशी दिग्गज राजकीय पैलवानांची फौज तालुक्यात असताना दुसर्या पक्षातून आयात उमेदवार स्विकारणार नसल्याचा सूर उमटत आहे. शरद पवार यांच्यावर निष्ठा असावी, यात दुमत नाही. परंतु, त्यांनी ती निष्ठा लोकसभा निवडणुकीपूर्वी दाखवायला पाहिजे होती. लोकसभा निवडणुकीनंतर निष्ठा दाखवून उपयोग काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वसंतराव मगर यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासोबत बोलण्यास सांगितले. त्यानुसार अकोला येथे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. परंतु, पक्षप्रवेश याबाबत गोपनीयता पाळण्यात आली. यांच्याच बाबतीत नाही तर अनेक इच्छुक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. परंतु, आपले नाव गुपित ठेवले आहे.
आजतरी गायत्री गणेश शिंगणे यांचे नाव आघाडीवर आहे. कारण त्याच डॉ.राजेंद्र शिंगणे यांना टक्कर देऊ शकतात. त्याच्या एवढ्या प्रबळ दावेदार सद्या तरी कोणीही नाही. सरळ लढत अपेक्षित नाही. कारण भाजपला डोकी वाढवायची आहे. मग तो पक्षावर किंवा अपक्ष निवडून आला तरी चालेल. हे सूत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आले आहे. भाजपाची रणनीती जास्त जागा नाही सुटल्या तर अपक्ष उमेदवार तोडीसतोड देऊन त्या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मग सिंदखेडराजा मतदारसंघ हा कसा मिळवायचा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. डॉ. सुनील कायंदे यांचे वडील माजी आमदार तोताराम कायंदे हे १० वर्षे लोकप्रतिनिधी होते. त्यांचा दांडगा अनुभव आणि संपर्क आजही जशाचा तसाच आहे. आजही त्यांचा गट, त्यांच्या गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. भाजपची रणनीती आणि समाजाचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. सुनील कायंदे यांचा संपर्क प्रत्येक गावात सुरू आहे. त्याच बरोबर ते शिंदे गटासोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासून आहेत. त्यामुळे भाजपाने उमेदवारी दिली तर बरं नाहीतर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी त्यांची आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कामाचा अनुभव आणि मतदारसंघात काम करण्याची नीती आजही कोणी हिरावून घेऊ शकत नाही. विकास आराखड्यातून काय काय कामे करता येतील, यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. आजही मतदारांत त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. जर आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी वेळेवर शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला तर आपली शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित होऊ शकते. असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यात काय घडामोडी होऊ शकतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.