शेतकर्यांची हजारो क्विंटल ज्वारी पडून; खरेदीची मुदत संपली, टार्गेटही संपले!
– शेतकर्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवेना!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – ज्वारी खरेदीची मुदत, त्याचबरोबर टार्गेटही संपल्याने पणन महासंघाने ज्वारी खरेदी आता बंद केली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या हजारो शेतकर्यांची हजारो क्विंटल ज्वारी गेल्या सहा महिन्यांपासून घरातच पडून आहे. त्यामुळे आता नोंदणी केलेल्या परंतु खरेदी बाकी असलेल्या हजारो शेतकर्यांचे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. या ज्वारी खरेदीसाठी लोकप्रतिनिधींनी आता आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.
पणन महासंघाने यावर्षी ज्वारी खरेदीला उशीरा सुरुवात केली. त्यामुळे सहाजिकच खरेदी लांबत गेली. यावर्षी सुरूवातीला जिल्ह्याला ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे टार्गेट देण्यात आले होते. यानंतर संबंधित विभाग व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याला १ लाख ६० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते व खरेदीची तारीखही वाढवून देण्यात आली होती. त्यानंतरही १ लाख क्विंटल चे अतिरिक्त उद्दिष्ट देण्यात आले होते. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने देखील वेळोवेळी सडेतोड व स्वयंस्पष्ट वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. वेळोवेळी उद्दिष्ट वाढवून दिल्याने यावर्षी चार महिन्यांत जवळजवळ ३ लाख क्विंटल ज्वारी खरेदी केली गेली. परंतु मुदत वाढवूनही विविध कारणांमुळे खरेदी लांबत गेली. आता ३१ ऑगस्ट ही ज्वारी खरेदीची डेडलाईन संपली, त्यासोबतच उद्दिष्टही संपल्याने पणन महासंघाकडून ज्वारी खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ‘पणन’कडे नोंदणी केलेल्या परंतु खरेदी बाकी असल्याने ४ हजार शेतकर्यांची एक लाख क्विंटलच्या जवळपास ज्वारी घरातच पडून आहे. त्यामध्ये विशेषतः घाटाखालील नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूरसह इतर खरेदी केंद्रांचा समावेश आहे.
येत्या ११ सप्टेंबररोजी दिल्ली येथे या संदर्भात संबंधित विभागाने बैठक आयोजित केली असून, सदर बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे, असे जिल्हा पणन अधिकारी एम.जी.काकडे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
वाढीव भाव भेटेल या आशेने गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी या ज्वारीचा लेकराप्रमाणे सांभाळ करीत असून, ज्वारी खरेदीसाठी संबंधित खरेदी केंद्रावर चकरा मारत आहेत. परंतु सदर केंद्रांना कुलूप दिसत आहे. सदर खरेदी बंद झाल्याने शेतकर्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून सदर ज्वारी खरेदीला मुदतवाढ घ्यावी, अथवा बाजार भावातील फरकाची रक्कम बोनस म्हणून सदर शेतकर्यांना द्यावी, अशी मागणी सदर शेतकरी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, रेशन दुकानातून ज्वारी घेण्यासाठी लाभार्थी पसंती देत नसल्याने याबाबतचा तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाकडून वरिष्ठाकडे सादर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.