कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – अश्विन कृष्ण चतुर्दशीयुक्त अमावस्या अर्थात दिवाळी या सणानिमित्त काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोल्हापुरात झेंडुंची फुले चारशे रुपये किलो दराने विकली गेली. कोरोनाकाळानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. फुलांना उच्चांकी दर मिळाल्याचा शेतकरीवर्गाला मात्र फारसा फायदा झाला नसून, व्यापारींची मात्र चांगलीच चांदी झाली आहे.
दीपावली लक्ष्मी पूजन असल्याने सकाळपासून फुले, ऊस, कर्दळ, कमळ, बत्तासू आदींची खरेदी फार मोठ्या प्रमाणात सुरू होती. काल लक्ष्मी पूजन निमित्ताने झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होती. सकाळी फुलांचा दर दिडशे रुपये किलो होता. तर सायंकाळी चारशे रुपये किलो झाला. पाच वाजेच्या सुमारास एकही झेंडूचे फुल दिसेनासे झाले होते. याचे कारण असे की, परतीच्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाली आहे. झेंडूच्या झाडांची फुले पावसाच्या तडाख्याने कुजून गेली असल्याने बाजारात फुलांचा तुटवडा निर्माण झाला होता. यात जशी मिळतील तशी शेतकर्यांनी फुले तोडून आणली होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्या फुलांना चारशे रुपये किलो भाव मिळाला. बहुतांश फुलांची खरेदी व्यापारीवर्गाने केली असल्याने शेतकर्यांना क्वचित तर व्यापार्यांना मात्र चांगला नफा कमाविता आला.
————