वर्धा (विशेष प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांची बदली झाल्याने नवनियुक्त पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी त्यांचा पदभार नुरुल हसन यांना सोपविला.
नुरुल हसन हे नागपूर येथेच कार्यरत होते. त्यामुळे त्यांना वर्धा जिल्ह्यातील घडामोडींसह गुन्हेगारीची माहिती आहे. त्यांनी गुन्हेगारांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे, नुरुल हसन यांचीच पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती होणार, याची यापूर्वीच चर्चा सुरू झाली होती. त्यावर या नियुक्तीने शिक्कामोर्तब झाले. त्यांनी भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्राच्या शिकवणी घेत कठोर परिश्रमातून भारतीय पोलिस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अलिगड विद्यापिठातून त्यांनी बीटेकची परीक्षा उत्तीण केली आहे. कठीण परिस्थितीतून त्यांनी यश मिळविल्याने त्यांच्या कारकिर्दीचा जिल्हा पोलिस यंत्रणेला लोकाभिमुख लूक मिळण्यास फायदा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील पोलिस दलासमोरील आव्हाने आणि आवाहने वेगवेगळी आहेत. वर्धा शहरातील रामनगर पोलीस ठाणे गुन्हेगारीच्या अड्ड्याचे ठाणे झाले आहे, त्यामुळेच आमदार डॉ भोयर यांनी या ठाण्याच्या हद्दीतील अड्ड्यावर छापा टाकला होता.