– जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची घोषणा
– आता शिंदे गटासह इतर राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूर विद्यापीठाची बहुचर्चित सिनेट निवडणूक आता राजकीय आखाडा ठरण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षाने उडी मारली आहे. सिनेट निवडणुकीत शिवसेना दहा जागांवर उमेदवार देणार असून , सांगली ३, सातारा ३ आणि कोल्हापूरसाठी ४ जागा देण्याची घोषणा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली. आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने विद्यापीठ निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. युवा सेनेच्या माध्यमातून ठाकरे गटाची शिवसेना प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली आहे. तर आता मुख्यमंत्री शिंदे गट व इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून आहे.
आमचा विजय होणार हे निश्चित, असे ठामपणे सांगत, संजय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की या निवडणुकीत सुटा, संभाजी ब्रिगेड, विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यार्थी विकास मंच रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र विजय आमचाच होणार हे निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर आम्ही लढा उभारणार!
कणेरी मठात कर्नाटक भवनाच्या बांधकामाविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. कर्नाटक भवनला शिवसेनेनेकडून कडाडून विरोध होत आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आमचा लढा कर्नाटक या नावाला आहे. कणेरी मठ इथं चालणार्या सर्व कामाचे आम्ही कौतुक करतो. पण कर्नाटक नाव पुढे करणार असतील तर त्याविरोधात आम्ही लढा उभारणार असा इशाराही संजय पवार यांनी दिला आहे.
——————–