Breaking newsHead linesMaharashtra

दिवाळी सुरु झाली तरी सरकारचा १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही!

– ‘ऑनलाईन’ची बोंब झाल्याने आता ‘ऑफलाईन’ शिधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत देणार देणार म्हणून जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’ अर्थात १०० रुपयांत साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर तेल हे अन्नधान्य दिवाळी सुरु झाली तरी बहुतांश रेशनकार्ड धारकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर सरकार शिधा देणार आहे का, असा संतप्त सवाल राज्यात उपस्थित केला जात असताना, या अन्नधान्याच्या वितरणातील गोंधळच चव्हाट्यावर आला आहे. हा शिधा ऑनलाईन पोहोच करण्याचा घाट सरकारमधील काही अतिशहाण्या अधिकार्‍यांनी घातला होता. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह सर्वच मीडियानी आवाज उठवत, त्यातील फोलपणा चव्हाट्यावर आणल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शिधा ऑफलाईन अर्थात रेशन दुकानातच देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दिवाळी सुरु झाली असली तरी, पुढील काही दिवसांत हा शिधा मिळेल, असे सरकारचे नियोजन दिसून येत आहे.

दिवाळीसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. यात दिवाळीसाठी रेशन दुकानातून १०० रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता दिवाळी सुरु झाली तरी अद्याप बहुतांश नागरिकांना हा शिधा मिळालेला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजारही सुरु झाला आहे. शिध्याच्या या कीटचे ऑनलाईन पद्धतीने नोंद करुन वाटप करण्यात येणार होते. मात्र जिथे हे कीट पोहोचले तिथे ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण येत होत्या. यामुळे आता ऑनलाईन शिधा मिळायला अडचणी आल्यास ऑफलाईन पद्धतीने शिधा द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रेशनकार्ड पाहून सरळ शिधावाटप करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातच १०० रुपयांच्या या किटची ३०० रुपयांना विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात हा प्रकार घडला. गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणार्‍या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


आनंदाचा शिधाच्या पिशवीवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोटो छापण्यास उशीर झाल्याने हा आनंदाचा शिधा वेळेत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यातच पैठण तालुक्यात एक वेगळा प्रकार समोर आला. पैठणमध्ये वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर स्थानिक आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांचादेखील फोटो पाहायला मिळाला. विशेष म्हणजे राज्यातील इतर कोणत्याही मंत्र्याने आपल्या मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर आपला फोटो लावलेला नाही. एकीकडे नागरिक या आनंदाच्या शिधाची वाट पाहत असताना सरकारमधील आमदार आणि मंत्री हे आपली प्रसिद्धी करण्यात गुंतलेले आहेत, असा आरोपही विरोधी पक्ष करत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!