मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सध्या शेतात रासायनिक खतांचा भडिमार केला जातोय. या शेतीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून पिकवलेले अन्नधान्य पोटात जात असल्याने हृदयविकार, किडनी स्टोन, कॅन्सर यासारखे घातक आजार वाढत आहेत. त्यामुळे निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता येणार्या काळात शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरायलाच हवी, आणि तीच काळाची गरज असून, सेंद्रिय शेतीच फायद्याची आहे असे आग्रही प्रतिपादन डॉ. केशव अवचार यांनी केले. तुळजाई एग्रोटेक आणि माय लाईफ मार्केटिंगच्या संयुक्त विद्यमाने जानेफळात सेंद्रिय शेतीची कार्यशाळा पार पडली. यावेळी उपस्थित शेतकर्यांना संबोधित करतांना डॉ. केशव अवचार बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ. अवचार म्हणाले की, सेंद्रिय शेतीला आता शासनाच्यावतीने सुद्धा प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व कृषी विक्रेत्यांना सेंद्रिय खताची दहा टक्के माल खरेदी व विक्री करण्याचे आदेश आहेत. यंदाच्या खरीप हंगामात सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्यांना फायदाच झाल्याने सेंद्रिय शेतीचे क्षेत्र आणखी वाढणार असल्याचेही ते म्हणाले. कमी खर्चात अधिक उत्पन्न व आपल्या कुटुंबाला विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही डॉ.अवचार यांनी केले. तुळजाई एग्रोटेक कंपनीच्यावतीने शेतकर्यांसाठी माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय तुळजाई एग्रोटेक कंपनीच्या वतीने क्रेडिटच्या माध्यमातून ३० हजार रुपये शेतकर्यांना देण्यात येणार आहेत. फळबागांसाठी व पिकांसाठी सेंद्रिय खते कंपनीकडे उपलब्ध असल्याचे डॉ.अवचार यावेळी म्हणाले.