कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – वडणगे येथील शिवसाई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने तब्बल दोन दशकांपासून विद्यार्थी दत्तक योजना जोपासत अनेकांचे शैक्षणिक भवितव्य घडवले आहे. या मंडळाचे आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले आहे. मंडळाचा हा आदर्श राज्यातील इतरांनीही घेतला तर गोरगरिब विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
प्रतीक अजित जाधव यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी याप्रसंगी सांगितले की, गणेश उत्सवातील खर्चात बचत करून मंडळाने विद्यार्थी दत्तक योजना २० वर्षांपूर्वी सुरू केली. आज या दत्तक योजनेअंतर्गत ५२ हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. याचे समाधान वाटते. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले आहे. यापैकी अनेक जण चांगल्या नोकरीवर आहेत तर काही जण करिअरच्या योग्य वळणावर आहेत. या योजनेला हातभार लावण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत असून याची व्याप्ती वाढत आहे. वडणगे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विलास पोवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मंडळाचे सेवाभावी वृत्तीने हे काम सुरू आहे. विद्यार्थी दत्तक योजना ही आदर्शवत आहे. गावातील इतर तरुण मंडळानी या उपक्रमाचे अनुकरण करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, आदर्श युवा शेतकरी पुरस्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार्या शिवसाई मंडळाचा विद्यार्थी दत्तक उपक्रम प्रेरणादायी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम समाज घडविणार्या या मंडळाचा लौकिक वाढत राहील , असे प्रतिपादन तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष अॅड. बाळासाहेब पाटील यांनी केले.
डॉ. अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देणार असल्याचे जाहीर केले. डॉ. आर. एस. पाटील यांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल देण्यात आल्या. बाळासाहेब पाटील, तानाजी पाटील, डॉ. विलास पोवार, शिवाजी पाटील, डॉ. अजित पाटील, वडणगे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, आर. पी. पाटील, सी. डी. शिंदे, उद्योजक शिवाजी पाटील, डॉ. अजित पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र देवणे सर यांनी केले.