मुंबई (विशेष प्रतिनिधी) – वर्धा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादक प्रकाश कथले यांना ‘अप्रतिम मीडिया’द्वारा दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील तीन पत्रकारांची सार्वमताद्वारे जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यात वर्ध्याचे प्रकाश कथले, मुंबईचे योगेश त्रिवेदी आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे. या तीनही ज्येष्ठ पत्रकारांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
प्रकाश कथले यांनी सातत्याने विकासात्मक पत्रकारिता केली आहे. नागपूर येथून प्रसिद्ध होणार्या नागपूर टाइम्स या इंग्रजी दैनिकाचे तसेच नागपूर पत्रिका दैनिका या मराठी दैनिकात त्यांनी वार्ताहर ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून १५ वर्षे काम केले. नंतर पुणे येथील सकाळ वृत्तपत्राचे २००० पासून सेवानिवृत्तीपर्यंत वर्धा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यानंतर दैनिक देशोन्नती या मराठी दैनिकात वर्धेत आवृत्ती संपादक म्हणून जबाबदारी सांभांळली. असा वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करण्याचा त्यांना किमान ५० वर्षाचा अनुभव आहे. आताही वृत्तपत्रातील संगणकीय बदल स्वीकारत प्रकाश कथले पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. प्रभावी डिजिटल प्रसार माध्यम म्हणून वेगाने पुढे आलेल्या मुंबईतील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे ते संपादक (नागपूर विभाग) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासोबत भजनाचा साथीदार म्हणून तीन वर्षांचा त्यांना सहवास मिळाला. शेती, पाणी, ग्रामविकास, ग्रामस्वच्छता यासह विविध विषयांवर शोधून वार्तांकन त्यांनी केले आहे. याशिवाय, शोधपत्रकारिता करीत त्यांनी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान, जॉर्ज फर्नांडिस, बॅ.नाथ पै, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंदराव तळवलकर, शांताराम बोकील, कुलदीप नय्यर, युधिष्ठिर जोशी, अनंत दीक्षित, मराठवाडाकार अनंत भालेराव, आदीसोबतचा निकटचा स्नेह राहिला आहे. शोध पत्रकारिता हे आवडते क्षेत्र निवडताना शुचिर्भूत पत्रकारितेचा वसा घेऊन आतापर्यंतच्या जीवन प्रवासाची त्याची वाटचाल आहे. शास्त्रीय संगीतात ग्वालियर घराण्याची गायकी जोपासली, राष्ट्रसंतांचा वसा चालवीत खंजिरी भजनाद्वारे जनजागृती, असे जीवन व्रत स्वीकारून वाटचाल आजही कायम आहे. पं.भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, मालिनी लाजूरकर, पं.एल.के.पंडित, डॉ.मिता पंडित, पं.प्रभाकर कारेकर, पं.शरद साठे यांच्यासोबत त्यांचा निकटचा स्नेह गायकीतून निर्माण झाला. सध्याही तेवढ्याच उमेदिने ते पत्रकारीतेत सक्रीय असून स्पॉट रिपोर्टिंगची आवड कायम आहे. निर्भीडतेने वास्तवाची मांडणी करताना त्यांना तडजोडीचा मोह पडलाच नाही. निर्भीड, निप्पक्ष पत्रकार म्हणून त्यांची वाटचाल सुरू असून, या कामाची दखल घेतच त्यांना अप्रतिम मीडियाच्या चौथ्या स्तंभ पुरस्कारात जीवन गौरव पुरस्काराकरिता निवडले गेले आहे.
त्यांच्या या गौरवाबद्दल दैनिक ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, व्यवस्थापकीय संपादक विनोद भोकरे, संपादक हेमंत चौधरी (पश्चिम महाराष्ट्र), संपादक संजय जोशी (मुंबई व कोकण), सहसंपादक एकनाथ माळेकर (विदर्भ) यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.