मेहकर (तालुका प्रतिनिधी) – रस्त्यावर बंद पडलेल्या टिप्परला मोटरसायकल धडकल्याने मोटारसायकलवरील भालेगाव (ता.मेहकर) येथील माजी सरपंच हे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाले. काल, २ ऑक्टोंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेहकर – जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ हा अपघात झाला. सुरेश विठोबा धोंडगे (४५, भालेगाव ता. मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या माजी सरपंचांचे नाव आहे.
सविस्तर असे, की भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान, मेहकर- जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गजवळ एक टिप्पर बंद पडलेल्या अवस्थेत उभे होते. टिप्पर चालकाने रेडीयम किंवा पाठीमागे असलेले लाईट बंद ठेवलेले असल्याने धोंडगे यांना टिप्पर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी टिप्परवर धडकली. त्यात धोंडगे यांचा जागीच मृत्यु झाला तर निकस गंभीर जखमी झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवून दिले. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. अखेर अग्निशामक दलाने टिप्पर विझवले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.