आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अलंकापुरीतील स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने राज्यातील नवरात्रौत्सवात आई तुळजाभवानी, मोहटादेवी, मांढरदेवी येथे दर्शनासाठी ज्याप्रमाणे न चुकता भाविक येत असतात. त्या प्रमाणेच स्वकाम सेवा कार्यकारी मंडळ गेल्या २५ वर्षांपासून देवींचे मंदिरात स्वच्छतेची अखंड सेवा करीत आहेत. तीर्थक्षेत्रातील मंदिरे आणि मंदिर प्राकार परिसराची स्वच्छता साफसफाई सेवा करून यात्रा काळात परिसरात स्वच्छता ठेवण्याचे सेवाकार्य स्वकाम सेवा मंडळ व्रत म्हंणून अनेक वर्षांपासून करीत आहे.
या स्वच्छतेची सेवा मोफत नि:स्वार्थ सेवा आळंदीतील माऊली मंदिरासह राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांच्या परिसरात केली जाते. यावर्षीचे नवरात्रोत्सव निमित्त महाराष्ट्रातील देवीच्या मंदिरात स्वच्छतेची सेवा करण्यासाठी मंदिर प्रशासनाच्या सेवक कामगाराशिवाय हजारो महिला आणि पुरुष स्वकाम सेवक देवा कार्य करत असल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिलाध्यक्षा आशा तापकीर यांनी सांगितले. या शेवट वायफर, झाडूसह स्वच्छता आणि स्वत:च्या जेवणाचे साहित्य घेऊन आलेल्या या स्वकाम सेवक कार्यकर्त्यांना मंदिर प्रशासना तर्फे निवास व्यवस्था होते. तुळजाभवानीच्या दरबारात कुठलाही मोबदला न घेता मोफत सेवा दिली जाते. १० वर्षांपासून तुळजापूर येथे स्वच्छता केली जाते.
आळंदीतील स्वकाम सेवा मंडळाचे पथक दरवर्षी नवरात्रातल्या पहिल्या माळेस देवीच्या सेवेसाठी रवाना होत असतात. आठव्या माळेपर्यंत सेवा पुरवली जाते. यात मंदिर परिसरातील कचरा झाडणे, सांडपाणी पुसणे, रात्री मंदिर स्वच्छ धुऊन साफ करणे. दैनंदिन स्वच्छता महिला व पुरुष स्वयंसेवकाचे वतीने केली जाते. देवदर्शनास आलेल्या भाविकांच्या समस्यां, अडचणी, मार्गदर्शन आणि भाविकांना वेळ प्रसंगी आरोग्य सेवेचे कार्यास मदत देखील केली जाते. रुग्णालयात पोच करण्यासाठी स्वकाम च्या दोन रुग्णवाहिका देखील यासाठी तैनात केल्या आहेत. सामाजिक, धार्मिक सेवा कार्याच्या बांधिलकीतून आळंदी स्वकाम सेवा मंडळ २५ वर्षां पासून सेवारत आहे.
यासाठी सेवा मंडळाचे संस्थापक डाॅ.सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर यांनी २५ वर्षांपूर्वी रामकृष्ण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात स्वकाम सेवा मंडळाची स्थापना केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माऊली देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी यांच्या परिश्रमातून मार्गदर्शनातून आळंदीतून या सेवेच्या कार्याचा श्री गणेशा करण्यात आला. पुढे आज पर्यंत पंढरपूर, तुळजापूर आदी धार्मिक तीर्थक्षेत्री स्वच्छतेची सेवा सुरु करण्यात आली आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेत संत गाडगेबाबांच्या विचारांने प्रेरित होऊन सेवा कार्य स्वच्छतेसाठी राबविले जात असल्याचे तापकीर यांनी सांगितले. सोडा अहंकार, मिळावा आनंद हे ब्रीद घेऊन नि:स्वार्थ भावनेने सेवा रुजू केली जात असल्याचे स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले आहे.