Uncategorized

पालकमंत्र्यांचे मेहकरात जोरदार स्वागत

– स्वागत थांबवून गुलाबराव पाटलांनी अ‍ॅम्बुलन्सला दिला रस्ता

मेहकर/ बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मेहकर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील शितला माता मंदिर परिसरातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती. दरम्यान, अचानक अ‍ॅम्बुलन्स आल्याने पालकमंत्र्यांनी तातडीने तिला रस्ता देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. त्यामुळे ही रुग्णवाहिका तातडीने पुढे जाऊ शकली. गुलाबराव पाटलांच्या या सहृदयतेचे घटनास्थळी कौतुक केले जात होते.

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे आज प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. त्यांचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांनी मेहकर येथे जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी मेहकर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली डॉ. आंबेडकर वाटिकेजवळून जात असताना मार्गावर एक रुग्णवाहिका आली. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना सूचना देत, आपले स्वागत थांबवले व त्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. मेहकर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रतापरावांऐवजी शिवसेनेसोबत राहणे पसंत केले आहे. त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता पाहाता, पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले गुलाबराव पाटील हे थेट मेहकरमध्ये पोहोचले. शिंदे गटाच्या हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त मेहकरात गुलाबराव पाटील यांची भव्य सभादेखील पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!