– चिखली तालुक्यातील ग्रामपातळीवरील विकासकामे खोळंबली
चिखली (तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे चिखली पंचायत समितीचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी गटविकास अधिकारी (बीडीओ)च पाहात आहेत. मात्र काही महिन्यापूर्वी कायमस्वरूपी रुजू झालेले बीडीओ सावळे हे काही कारणांमुळे दीर्घ रजा टाकून निघून गेले. त्यामुळे प्रशासनाला देऊळगावराजा पंचायत समितीच्या बीडीओंकडे प्रभारी पदभार सोपवावा लागला. अशा या भोंगळ कारभारामुळे कार्यालयीन, अथवा अनेक गावांची विकासाची कामे खोळबून पडल्याने कर्मचारी व नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
जिल्ह्यात पंचायत समिती चिखली ही वर्ग १, (अ) चा दर्जा असलेली आहे. या पंचायत समितीचा विस्तार १४० गावांपेक्षाही जास्त असल्याने दोन बीडीओंना कारभार सांभाळावा लागतो. त्यातच सभापती व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक कारभार पाहत आहेत. या तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने दररोज पंचायत समितीमध्ये बाहेर गावावरून येणार्या जाणार्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, तसेच या चिखली तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाचे एकमेकांत वरचढ आहेत. ही पक्षनेते मंडळी नागरिकांचे कामे करुन देण्यासाठी दररोज तालुक्यात हजर राहून कामे करून देण्याची एकमेकामध्ये स्पर्धा करतात. गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी अधिकारी येतात आणि एका महिन्यात अथवा १५ दिवसातच पदभार सोडून जातात. त्यामुळे येणार्या नवीन बीडीओंचा सत्कार आणि खातेबदल करता करता कार्यालयीन कर्मचारी यांची चांगलीच डोके दुखी झालेली आहे. आता तर पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक कारभार पाहत आहे. असे असताना अचानक गेल्या काहीं महिन्यापूर्वी कायमस्वरूपी रुजू झालेले बीडीओ सावळे यांनी आजारी रजा घेवून घरी निघून गेले. असा हा भोंगळ कारभार गेल्या दोन वर्षांपासून सतत सुरू असल्याने प्रशासनाने कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी देऊळगावराजा पंचायत समितीच्या सहाय्यक बीडीओ तेजस्विनी आवळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलेला आहे. त्या महिला अधिकारी दोन तालुक्यांचा कार्यभार पाहात आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सतत आठ ते दहा प्रभारी बीडीओ रूजू झाले आणि पदभार सोडून गेले. त्यामध्यें गेल्या एका वर्षात पंचायत समितीला लाभलेले प्रभारी बीडीओ म्हणून सहाय्यक बीडीओ जायभाये दोन वेळेस, विस्तार अधिकारी वाघ, देऊळगावराजा येथील बीडीओ इंगळे, मेहकरचे बीडीओ जाधव, बुलडाणा पंचायत समितीचे सहाय्यक बीडीओ भरत हिवाळे यांना दोन वेळेस पदभार, असा हा प्रकार सुरू असल्याने चिखली पंचायत समितीचे सुटलेले प्रभारी बीडीओ पदाचे ग्रहण पुन्हा लागले आहे. आता सहाय्यक बीडीओ हिवाळे आणि प्रभारी म्हणून देऊळगावराजा पंचायत समितीच्या सहाय्यक बीडीओ तेजस्विनी आवळे यांनी पदभार हाती घेतला आहे .त्यामुळे आता पुन्हा अधिकार्यांना खाते बदल करणे, विकासकामे करणे, कार्यालयीन कामे यांची चांगलीच धावपळ उडणार आहे.
—————–