– संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यामागचे गौडबंगाल काय?
प्रताप मोरे (चिखली तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून मेरा बुद्रूक ते अंढेरा रोडचे डांबरीकरण करून नुकतेच सहा महिनेदेखील झालेले नाही. तर पहिल्याच पावसाळ्यात हा रोड उखडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपये पाण्यात गेले असून, अधिकारी मात्र संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. अधिकार्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे डाबरी करणाचे केलेले काम थातूरमातूर झाल्याने सहा महिन्यांतच डांबर उखडून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे उघडकीस आले आहे.
बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ग्रामीण भागात लाखो करोडो रुपायाचे रस्ता दुरुस्तीचे मंजूर कामे काही लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार करीत आहेत. त्यामध्यें काही कामे अधिकारी ठेकेदाराच्या नावावर घेवून पैसे कमवितात. अशा या साटेलोटेच्या प्रकारामुळे काही ठेकेदार मंडळी अधिकारी वर्गाच्या संगनमताने आर्थिक घेवाण देवाण करुण रोडच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत निकृष्टदर्जाचे कामे करुन मोकळे होतात. असाच एक प्रकार मेरा बुद्रूक ते अंढेरा रोडवर उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मेरा बु. ते अंढेरा रोडचे डाबरीकरण नुकतेच सहा महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. या रस्त्या वरून खडकपूर्णा नदी पात्रातून वाळूचे क्षमतेपेक्षा जास्त भरलेले अवैध टिप्पर चालक मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक करतात. जड वाहनांची वाहतूक दररोज सूरू असल्याने नुकताच सहा महिन्यापूर्वी केलेला डाबरीकरण रस्ता उखडून रोडवर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. त्याच बरोबर मेरा बुद्रूक फाटा ते मेरा खुर्द रस्त्यावर असाच प्रकार उघडकीस आला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी तात्काळ पाहणी करून ठेकेदारावर आणि अधिकार्यावर कडक कार्यवाही करून रोडची दुरुस्ती करावी, अशी मागणी मेरा बुद्रूक, गुंजाळा , अंढेरा , गावकरी करीत आहेत.