चिखली (एकनाथ माळेकर) – मित्राची कार घेवून गेलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची कार उलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास चिखली – मेहकर रोडवरील कोलारा फाट्यासमोरील गुरकुल शाळेजवळ घडली. यावेळी कार एवढी भरधाव होती की सुमारे 4 ते 5 पलट्या खाऊन रोडच्या बाजूला 100 फूट अंतरावर जाऊन पडली. यावेळी हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त होत असताना मृताकाच्या चुलत भावाने हा अपघात नसून, घातपात असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करत सदर माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ला दिली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बु येथील अजय बद्री आंधळे वय 22 हा चिखली येथील अनुराधा फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी करीत होता. दरम्यान आज 1 ऑक्टोबर रोजी अजय आंधळे हा सकाळच्या सुमारास त्याच्या मित्राची कार क्रमांक एम एच – 14 डी एफ – 6723 ही घेवून महेकर – चिखली मार्गाने निघाला होता. मात्र मेहकर चिखली मार्गाने जात असताना 11 ते 12 च्या दरम्यान कोलारा फाट्या समोरील गुरकुल शाळेजवळ सदर कार उलटली. ही कार एवढी भयंकर उलटली होती की सदर कार ने चार ते पाच पलट्या खाऊन रोडच्या 100 फूट अंतरावर जाऊन पडली. या घटनेत अजयचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी चिखली पोलीस कारवाई करीत असून तपास सुरू आहे.
दरम्यान, मृतक अजय आंधळे याचा अपघात झाला नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, कारण तो विद्यार्थी असून अनुराधा फार्मसी मध्ये शिकत आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या अंगावर चट्टे दिसत असून, हा अपघात नसून घातपातच आहे. त्यामुळे या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत सदर माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.