वाळूतस्करांनी ‘खडकपूर्णा’ पूर्ण पोखरली; महिनाकाठी दीड कोटींची वाळूतस्करी? कोणते अधिकारी झाले मालामाल?
– वाळूतस्करांची शक्कल : सिंदखेडराजा तालुक्याच्या हद्दीतून बोटींच्या सहाय्याने दिवसाढवळ्या वाळूउपसा; मात्र वाळूसाठा केला देऊळगावराजा तालुक्याच्या हद्दीत!
– दोन्हीही तहसीलदार एकमेकांवर जबाबदारी झटकून मोकळे? वाळूतस्करांवर कारवाई कोण करणार?
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तहसीलदारांच्या हद्दीतील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळूतस्करी जोरात सुरू असताना, ही वाळूतस्करी आमच्या हद्दीत नाही, असे म्हणत सिंदखेडराजा महसूल यंत्रणेने काखा वर केल्या आहेत. तर वाळूतस्करांनी अशी शक्कल लढवली आहे, की नदीपात्रात बोटींच्या सहाय्याने सिंदखेडराजा हद्दीतून वाळूउपसा करायचा, तर वाळूसाठा मात्र देऊळगावराजा तालुका हद्दीत करायचा, व तेथून वाळूची चोरटी वाहतूक करायची. त्यामुळे दोन्हीही तहसीलदार कारवाई करण्याचे टाळत असून, त्यातून खुलेआम वाळूतस्करी जोरात सुरु आहे. दररोजचा होणारा वाळूउपसा व आजरोजीच्या बाजारातील वाळूचे दर पाहाता, महिनाकाठी दीड ते दोन कोटी रुपयांची वाळू तस्करी केली जात असून, या पैशातून सिंदखेडराजा व देऊळगावराजा तहसीलमधील कोणते महसूल अधिकारी गब्बर होत आहेत, याचा तपास ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स व एसीबीने करण्याची गरज आहे. या दोन्ही तहसीलमधील अधिकार्यांच्या नामी व बेनामी मालमत्तांची तपासणी केली तर मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता पाहाता, ईडी, इन्कमटॅक्स व एसीबीने राजकीय नेत्यांच्या मागे लागण्यापेक्षा या अधिकार्यांना रडारवर घ्यावे, अशी मागणीही ग्रामीण भागातून होत आहे.
निमगाव वायाळ गावाच्या खडकपूर्णा नदीपात्रातून खुलेआम सुरु असलेल्या वाळूतस्करीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल यंत्रणा व वाळूतस्कर दोघेही हादरून गेले आहेत. तर पंचक्रोशीतील गावकर्यांनी हा धक्कादायक प्रकार राज्यस्तरावर उघडकीस आणल्याबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला फोन करून धन्यवाद दिले आहेत. या वाळूतस्करीबाबत सिंदखेडराजाचे तहसीलदार सावंत यांना माहिती विचारली असता, त्यांनी ”सदर रेती ही आमच्या भागातून जात नाही. रेती काढण्यासाठी आमच्या भागातून रस्ता नाही, रेतीतस्करांचा रस्ता दुसर्या तालुक्यातून जातो, ते मॅपिंगच्या फोटोवरही बरोबर दिसत आहे.” असे सांगून वाळूतस्करीचे घोंगडे नामोल्लेख टाळत देऊळगावराजा तहसीलदारांवर झटकले. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे, की वाळूतस्कर हे नदीच्या सिंदखेडराजा हद्दीतून बोटींच्या सहाय्याने वाळूउपसा करत असून, ही वाळू देऊळगावराजा तालुक्याच्या हद्दीत टाकत आहेत, व तेथून ट्रक, ट्रॅक्टर व डंम्परच्या सहाय्याने ही तस्करीची वाळू वाहतूक केली जात आहे. दोन तहसीलदारांच्या तथाकथित वादाचा वाळूतस्करांना बरोबर फायदा होत असून, दिवसाढवळ्या डंम्परच्या डंम्पर भरून चोरटी वाळू वाहतूक खुलेआम सुरु आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीनुसार, दररोजची वाळूचोरी आणि सद्याचे बाजारभाव यांचा हिशोब करता, महिनाकाठी दीड ते दोन कोटींची वाळूचोरी येथून होत आहे. चोरीच्या वाळूचा हा मलिदा नेमके कोणते तलाठी, मंडळअधिकारी, गौणखनिजचे नायब तहसीलदार व संबंधित तहसीलदार नियमितपणे लाटत आहेत, याबाबत एसीबी, ईडी, सीबीआय या तपासी यंत्रणांनी विशेष दखल घेऊन तपास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिवाय, या महसूल अधिकार्यांच्या नामी व बेनामी मालमत्ता व संपत्तीचीही तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भरदिवसा राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याने, आता खुद्द जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनीच आपल्या खास पथकांमार्फत छापे मारून वाळूतस्करीप्रकरणी कारवाई करावी. तसेच, संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनाही जाब विचारावा, अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करून शासनाची गौणखनिज चोरी रोखावी, व आपल्या कर्तव्यनिष्ठतेचा परिचय द्यावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
”ब्रेकिंग महाराष्ट्रवाले मागे लागले, दोन-तीन दिवस वाळूउपसा थांबवा!”
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने डिग्रस बुद्रूकपासून ते निमगाव वायाळपर्यंत वाळूतस्करांच्या मागावर आपली स्वतंत्र यंत्रणा उभी केली असून, वाळूतस्करीचे जीपीएस लोकेशनसह फोटो व व्हिडिओ शुटिंग केले जात आहे. ही सर्व माहिती राज्याचे कणखर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुराव्यासह दिली जाणार आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट’्रने वाळूतस्करांचा व त्यांना साथ देणार्या संबंधित महसूल अधिकार्यांचा भंडाफोड केल्यानंतर, या दोन्ही यंत्रणा हादरल्या आहेत. ”ब्रेकिंग महाराष्ट्रवाले मागे लागले आहेत, काही दिवस वाळूउपसा बंद ठेवा”, अशा सूचना वाळूतस्करांना देण्यात आल्या असल्याचे गोपनीय सूत्राने कळवले आहे. येथून जालना, बीड, बुलढाणा, खामगाव व औरंगाबादपर्यंत वाळू जात असते. औरंगाबाद येथील ज्या लोकांनी वाळू मागितली होती, त्यांनाही काही दिवस डिलेव्हरी देणे शक्य नाही, असे निरोप दिले जात असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांग्िातले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतःच तातडीने कार्यवाही करून येथील वाळूतस्करी कायमची मोडित काढावी व संबंधित जबाबदार अधिकार्यांवर नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
—————–