‘गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही’ असे म्हणत महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन
मुंबई – (राजकीय प्रतिनिधी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेले तत्कालीन शिवसेना नेते आणि सध्याचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसणार आहे. बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोडांकडे पाहिले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर महंतांनी आज 30 सप्टेंबर रोजी मुंबईत जाऊन पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. संपूर्ण राज्यात १.५ ते २ कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत. कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते, असे सुनिल महाराज यांनी यावेळी बोलताना म्हटले.
तर, उद्धव ठाकरेंनीही सुनिल महाराजांचे स्वागत करताना नाव न घेता संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. कारण, शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण, बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही, त्यामुळे हा समाज आमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच, दसऱ्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही ते म्हणाले.महंत सुनील महाराज हे शिवबंधन बांधणार असल्याचं त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं होतं.
आपण बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो असता बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तिथे मिळालेली वागणूक हीन सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी १० मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचं दिसून आले असे महंत सुनिल महाराज यांनी यापूर्वी सांगितलं होते.