संतांनी मानवी जन्म हा कसा दुर्लभ आहे, हे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. प्रत्येकाच्या जीवनाचे कल्याण झाले पाहिजे. प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचे सार्थक झाले पाहिजे. त्यासाठी सर्वच संतांनी आपला देह झिजविला आहे. संतांनी लोकांना त्यांच्या हिताचा मार्ग सांगितला. वेळोवेळी लोकांना उपदेश केला. संत हे अतिशय संवेदनशील असतात. लोकांचे अकल्याण त्यांना काही सहन होत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांचीही हीच तळमळ दिसून येते.
प्रत्येकाच्या हातून काहीतरी विशेष कर्म होण्यासाठी आपल्याला मानवी जन्म मिळाला आहे. अशी त्यांची धारणा दिसून येते. आपल्या ‘अनुभूति’ ग्रंथातील १९४ क्रमांकांच्या अभंगात महाराज म्हणतात की,
विशेष करून, येसाल परत । वाटले मनात, वेळोवेळी।।
पण तुम्ही तेथे, वेळ घालविला। आणि मागे, आला परतोनि।।
केले तर होते, धाडसाने काही। पुन्हा ‘चान्स’ नाही, करण्याचा।।
शुकदास म्हणे, जन्माला येऊन । व्यर्थचि जीवन, घालविले।।
हे मानवा तू तुझ्या जीवनात काहीतरी विशेष कार्य करशील, असे वेळोवेळी माझ्या मनात वाटत राहिले; परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात आपला वेळ निव्वळ फुकट घालवून रिकाम्या हाती परत आले. खरे म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये धैर्याने काही करायचे ठरवले तर नक्कीच ते पूर्णत्वास जाते. कारण मानवी जन्म हा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नसून एकदाच मिळतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले पाहिजे. तसे जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा संधी नाही. शुकदास महाराज म्हणतात, हे मानवा तुझा माणसाच्या जन्माला येऊन काही उपयोग झाला नाही. कारण तुझे जीवन तू अतिशय व्यर्थपणे घालविले आहे. आधुनिक काळामध्ये ईश्वराला साक्ष ठेवून मानवाने आपल्या जीवनाचे सार्थक करावे. दिशाहीन जीवन जगणार्या, कर्तव्यशून्य, अज्ञानी जनांचे व्यर्थ जीणे पाहून महाराजांना वाईट वाटते. त्यांचे मन दुःखी होते. म्हणून कर्मयोगी संत शुकदास महाराज सर्वसामान्यांना आपल्या जीवनाचे कल्याण करून घेण्याचा सल्ला देतात. याच आशयाचा त्यांच्या ‘अनुभूति’ ग्रंथात१९५ क्रमांक आणखी एक अभंग आढळून येतो. कर्मयोगी संत शुकदास महाराज म्हणतात,
ह्या सुख दुःखांच्या, दर्या-खोर्यातून। चालेले जीवन, मानवाचे।।
उगमाची नसे, कोणासी कल्पना । शेवट कळेना, काय होतो।।
प्रारंभी असतो, ओहोळ लहान। शेवटी महान, सिंधू पासी।।
शुकदास म्हणे, आमुचे जीवन । तुमची तहान, भागविल।।
माणसाचे जीवन हे सुख दुःखांच्या दर्या-खोर्यातून चालले आहे. मानवाला जीवनामध्ये कधी सुख येते तर कधी दुःख येते. मनुष्य जन्माचे नेमके प्रयोजन काय आहे? मनुष्याचा अखेर शेवट कसा होतो? हे काही कळायला मार्ग नाही. याची कुणालाच कल्पना नसते. प्रारंभी नदीच्या उगमस्थानी पाणी फार कमी असते. समुद्राला मिळताना मात्र त्याचा आवाका खूप मोठा होतो. शुकदास महाराज म्हणतात, असे असले तरी संतांचे जीवन मात्र इतके समृद्ध आणि परिपूर्ण असते, की भक्ताची तृष्णा त्यातून भागल्याशिवाय राहत नाही.
सर्वसामान्य माणसांचे जीवन सुख दुःखाने भरलेले असून, त्याला आपला प्रारंभ आणि शेवटी कळत नसला तरी संतांच्या सान्निध्यात आल्याने त्याच्या आयुष्याचे कल्याण होते. महाराजांनी त्यासाठी सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनाची नदीच्या ओहोळाशी तुलना करून नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिची व्याप्ती जशी व्यापक होते. तसे संत कृपेने मनुष्याचे जीवन सार्थकी लागते. असे कर्मयोगी संत शुकदास महाराज म्हणतात. निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाला आज आपण जर भेट दिली तर ‘ केले तर होते, धाडसाने काही’ याची प्रत्यक्ष अनुभूतितील ‘अनुभूति’आल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते असून, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. मो.नं ९९२३१६४३९३)