खामगाव (तालुका प्रतिनिधी) – भारत देश विविध जाती, धर्म, पंथ, विविध भाषा, विविध संस्कृती विविधतेने नटलेला देश आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्ष या देशाची राष्ट्रीय एकता, अखंडता जोपासणारा या देशातील सर्वात महान ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय ‘संविधान’ होय. संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाला संविधान अर्पण केले. आज संविधानावर आधारित देशातील लोकशाही ७५ वर्ष स्वाभिमानाने उभी आहे. त्या संविधान दिनाच्या निमित्ताने आज जिल्ह्यातील आंबेडकरवादी विविध संघटनांनी एकत्र येऊन भारतीय संविधान ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर गाव संविधान व हर घर संविधान हे अभियान राबवून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करणार असल्याची घोषणा भाई प्रदीप अंभोरे भारतीय संविधान बचाव संघर्ष समिती यांनी केली.
सर्व प्रथम भाई प्रदीप अंभोरे, श्रीकृष्ण मोरे, भाई बाबुराव सरदार, सारंगधर वाकोडे, देवकाबाई गव्हाळे, विजय बोदडे, इलियास खान पठाण आदी संयुक्त संघटना नेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व संविधान प्रस्ताविकेसमोर दीप प्रज्वलन केले. भूमी मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा, भीमशक्ती, रिपाइं, पिरिपा आदि संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी संयुक्त संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून ‘संविधान दिन चिरायू होवो’ ‘डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणा देत, भारतीय संविधानाचा ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा केला. या प्रसंगी बाबुराव सरदार, श्रीकृष्ण मोरे यांचे समायोचित भाषणे झालीत. संयुक्त संघटनेंद्वारे शेवटी भारतीय संविधानाचा ७५ वा अमृत महोत्सव जिल्ह्यात हर गाव संविधान व हर घर संविधान ह्या दोन टप्प्याचे अभियान संविधान बचाव संघर्ष समिती व संयुक्त संघटनाद्वारे साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत मुंडे जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती मोर्चा यांनी केले, तर आभार श्रीकृष्ण मोरे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती यांनी मानले.