चिखली (विशेष प्रतिनिधी) – देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून मागील काही दिवसांपासून रेती उपसा बंद होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात रेती उपसा करणार्या बोटी व रेतीमाफियांनी या नदीपात्रात भरदिवसा धुमाकूळ घालून वारेमाप रेतीतस्करी चालवली आहे. तसेच, आतादेखील भरदिवसा अवैध वाळूचोरीचे डंपर भरधाव चालू आहेत. सद्या इसरूळ ते चिखली रोडने अवैध वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे; तेव्हा या भागातील महसूल व पोलिस प्रशासन झोपलेले आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. परिसरातीलच असलेल्या या वाळूतस्करांचा प्रशासनात कोणता बाप बसला आहे? म्हणून हे वाळूचोर खुलेआम वाळूचोरी करत आहेत, असा संतप्त सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
इसरूळ ते चिखली रोडने दिवसाढवळ्या वाळूतस्करी होत आहे. सुसाट जाणार्या या डंपरमुळे लोकांचे जीव धोक्यात आले असून, मलगी ते इसरूळ रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था या वाळूतस्करांनी करून ठेवली आहे. रेतीतस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच, रात्री या रेतीतस्करी करणार्या वाहनांवर कार्यवाही का करण्यात येत नाही? रात्रीची गस्त घालणारे महसूल व पोलिस प्रशासनाचे अधिकारी करतात तरी काय? असे संतप्त सवाल आता निर्माण झालेले आहेत. देऊळगावराजा तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही, तरीदेखील या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाळूचोरी होत आहे; याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेतीचा मोठ्या प्रमाणात छुप्या पध्दतीने होत असलेला उपसा यामुळे नदीपात्र धोक्यात आले असून, पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. चिखली तालुक्यातील सुरू असलेल्या घरकुलांचे बांधकाम महागड्या रेतीमुळे रखडले आहे. तर दुसरीकडे, चोरट्यामार्गाने व महसूल प्रशासनाची रॉयल्टी बुडवून मात्र लोकांना खुलेआम चोरटी वाळू उपलब्ध होत आहे. महसूल प्रशासनाने या वाळूतस्करीत तातडीने गांभीर्याने लक्ष घालून रेती घाट सुरू करावे, व सर्वसामान्य माणसांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जनमाणसातून पुढे आली आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील चिंचखेड, मंडपगाव, दिग्रस या गावांच्या नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास रेतीउपसा केला जात असून, इतर नदी-नालेसुद्धा पोखरले गेले आहेत. वाळूतस्करांनी वाळूचे भावही मोठे वाढून ठेवले असून, त्यामुळे तालुक्यातील गोरगरिबांना घरकुल बांधणे कठीण झालेले आहे. शासनाने बेघरांना घरकुल मिळावे, यासाठी ग्रामपंचायत पातळीवर मोठा गाजावाजा करीत योजना राबवित आहे. मात्र घरकुल उभारणीसाठी रेतीचा उपयोग महत्वाचा असून, रेतीघाट बंदमुळे घरकुलधारकांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शिंदे गटाचे युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर हे सातत्याने रेतीतस्करांविरोधात आक्रमक भूमिका घेत आले आहेत. मात्र आता परत एकदा खुलेआम रेतीतस्करी सुरू असल्यानंतरही तेही शांत बसलेले दिसत आहेत. तेव्हा या वाळूचोरांना महसूल व पोलिसांचे अभय पाहाता, संतोष भुतेकर हे परत आक्रमक भूमिका घेतील का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.