Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आता काळजीवाहू मुख्यमंत्री!

- मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात असल्याने शिंदे नाराज?; सर्व भेटीगाठी केल्या रद्द!

– मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी; लवकरच शपथविधीची शक्यता!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने आज (दि.२६) राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रसंगी भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील उपस्थिती होती. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारत, त्यांना पुढील सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असल्याने राज्यातील मंत्रिमंडळ संपुष्टात आले आहे. शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र राज्यपालांनी त्यांना सुपूर्द केले असून, याप्रसंगी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, गेली ३६ तास मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग करत असलेले एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून कळते आहे. लवकरच फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शिंदेंचे ६, अजितदादांचे ४ आमदार शपथ घेणार असल्याचेही राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवावे, यासाठी एकनाथ शिंदे हे गेले ३६ तांस भाजप हायकमांडशी वाटाघाटी करत होते, परंतु त्यात त्यांना अपयश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर काल रात्रीच नवी दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील, हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याचीही चर्चा मुंबईत होती. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे. त्यानंतर शिंदे यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्याची माहिती आहे. Imageआपली नाराजी त्यांनी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचवलेली आहे, असेही सांगण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावर पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांदेखील शिंदे भेटलेले नाहीत. दुसरीकडे, मुख्यमंत्रिपद जाणार असल्याने शिंदेंचे आमदारदेखील नाराज झाले आहेत. महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभेत नेत्रदीपक यश मिळाल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याचकडे ठेवण्यात यावे, अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी होती.


महायुतीत भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्याने संख्याबळाच्या खेळीत मित्रपक्षांचे महत्त्व कमी झालेले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना थेट पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे. शिंदे गटाकडून संभाव्य मंत्र्यांची नावेदेखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या ११ जणांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या १३ जणांची नावे पुढे आली आहेत. मंत्रिमंडळाचा शपथविधी आजच होईल, अशी चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरू होती.

https://x.com/i/status/1861299886748008924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!