निमगाव वायाळच्या खडकपूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळूची तस्करी!
– जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ महसूलमंत्र्यांकडे जाणार!
– खडपूर्णा नदी वाळूतस्करांनी पोखरली, महिनाकाठी दीड ते दोन कोटींच्या वाळूची खुलेआम चोरी?
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – रॉयल्टी वसुलीत पिछाडीवर असलेल्या सिंदखेडराजा तहसीलदारांच्या हद्दीतील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळूतस्करी जोरात सुरु असून, विशेष म्हणजे वाळूतस्कर हे बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत. त्यांना विरोध करणार्यांना धमक्या दिल्या जात आहेत. स्थानिक तलाठी, मंडळअधिकारी यांना ही वाळूतस्करी माहिती असूनही हे अधिकारी ‘अर्थ’पूर्ण दृष्टीकोनातून या वाळूचोरीकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे भरदिवसा राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याने, आता खुद्द जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनीच आपल्या खास पथकांमार्फत छापे मारून वाळूतस्करीप्रकरणी कारवाई करावी. तसेच, संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनाही जाब विचारावा, अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे.
— ही पहा अशी चालते खुलेआम वाळूतस्करी —
बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी सहा महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील २० वाळू घाटांचे लिलाव केले होते. त्यापैकी १५ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी वाळू स्वस्त व्हावी, यासाठी फक्त ६०० रुपये प्रतिब्रास ही बेस प्राईज ठेवून वाळू घाटांचे लिलाव केले असले तरी आजरोजी खडकपूर्णा नदीची वाळू साडेचार ते पाच हजाराने मिळत आहे. सर्व खर्च मिळून ही वाळू खरे तर दीड ते दोन हजार ब्रासने विकली जाणे अपेक्षित आहे. परंतु, अव्वाच्या सव्वा दराने वाळू विकली जात असल्याचे धक्कादायक वास्तव असून, वाळूतस्करांमुळे वाळूचे भाव दुप्पट ते तिप्पट झालेले आहेत. कारण, त्यांनी अनेकांना ‘हप्ते’ चालू केले असून, त्यामुळेच सर्व अधिकारी या वाळूचोरांकडे दुर्लक्ष करत असावेत, असा संशय निर्माण झालेला आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या वाळू घाटांच्या लिलावात देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बुद्रूक व सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील घाटांचाही लिलाव झालेला आहे. परंतु, लिलाव झालेल्या घाटाव्यतिरिक्तच्या ठिकाणांहून वाळूउपसा सुरु असून, वाळूतस्करांनी खडकपूर्णा नदी पूर्णपणे पोखरली आहे. येथील वाळू चक्क, जालना, औरंगाबादपर्यंत जात आहे. विशेष धक्कादायक बाब अशी, की एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी सिंदखेडराजा तहसीलदारांना ठरवून दिलेल्या रॉयल्टी उद्दिष्टापोटी देऊळगावराजा तहसीलदारांनी १४.७९ व सिंदखेडराजा तहसीलदारांनी २७.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट गाठले होते. त्यामुळे आता खुद्द जिल्हाधिकारी यांनी स्वतः आम्ही येथे प्रसारित करत असलेल्या व्हिडिओंची दखल घेऊन, या दोन्ही तहसीलदारांना जाब विचारणे अपेक्षित आहे. डिग्रस बुद्रूक व निमगाव वायाळ या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात व दिवसाढवळ्या बोटीच्या सहाय्याने वाळूतस्करी सुरु असून, या वाळूतस्करीकडे सिंदखेडराजा व देऊळगावराजा तहसीलदार कानाडोळा का करत आहेत? त्यांनी या वाळूतस्करांना पाठीशी घालण्याची भूमिका का घेतली? याचा जबाब जिल्हाधिकारी यांनी या दोन तहसीलदारांना विचारण्याची गरज आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ व डिग्रस बुद्रूक या गावातील खडकपूर्णा नदीपात्रातून खुलेआम वाळूतस्करी सुरु आहे. विशेष म्हणजे, अधिकृत ठेकेदारासह मोठ्या प्रमाणातील वाळूतस्कर नदीपात्रातून वाळूउपसा करत असून, त्यासाठी बोटींचाही वापर केला जात आहे. तसेच, डंपर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथून वाळू वाहतूक होत आहे. महिनाकाठी दीड ते दोन कोटींची चोरटी वाळू वाहतूक येथून होत असल्याची माहिती गोपनीय सूत्राने दिली आहे. ग्रामस्थांनी या वाळूतस्करीबाबत स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना सांगितले आहे. तरीदेखील हे महसूल अधिकारी या वाळूतस्करीकडे कानाडोळा करत आहेत. सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तहसीलदारदेखील या वाळूतस्करीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असून, याप्रकरणी आता जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे. महसूल प्रशासनाने तातडीने ही चोरटी वाळू वाहतूक बंद केली नाही, तर याबाबत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने व्हिडिओ पुराव्यांसह सविस्तर तक्रार दाखल केली जाणार आहे.