पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे येथे काल सकाळी आंदोलन करण्यात आले. तसेच, पूर्वसूचना देऊनही समाज कल्याण आयुक्त कार्यालयात गैरहजर राहिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘सामाजिक अन्याय विभाग, इथे अन्याय करून मिळेल’ असे बॅनर आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकाविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचार्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परदेशी जाणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवणेबाबत अशा विविध प्रश्नांवर, इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आरक्षणाच्या आराखड्याप्रमाणे काटेकोर पालन करून करण्यात याव्या, यासह विविध विद्यार्थी प्रश्नांवर वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर काल (दि.१५) भव्य आंदोलन करण्यात आले.
समाज कल्याण आयुक्तांना पूर्वकल्पना देऊन ही ते आज गैरहजर होते, त्याचा निषेध म्हणून आंदोलक ओंकार कांबळे आणि जानवी शेलार यांनी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. तसेच समाज कल्याण आयुक्तालयाचे नाव बदलून ‘सामाजिक अन्याय विभाग, इथे अन्याय करून मिळेल’ असे बॅनर आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकवले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, वंचितचे राज्याचे नेते अनिल जाधव, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, अफरोज मुल्ला, विशाल गवळी, ऋषीकेश नांगरे पाटील महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अनिता चव्हाण व शहर व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.