Marathwada

कर्जबाजारी शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या

– सततची नापिकी, बेभरवशाची शेती, फायनान्सवाल्यांचा तगादा यांनी घेतला गरीब शेतकर्‍याचा बळी

– राज्य सरकारने तातडीने एक लाखाची मदत देण्याची मागणी ऐरणीवर

पैठण (तालुका प्रतिनिधी) – बेभरवशाची झालेली शेती, सततची नापिकी आणि त्यामुळे खासगी फायनान्सवाल्याचे कर्ज फेडण्यास आलेले अपयश व फायनान्सवाल्यांनी लावलेला तगादा, यामुळे हतबल झालेल्या अवघ्या ३८ वर्षीय तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर झाला आहे. राज्य सरकारने तातडीने या शेतकरी कुटुंबास एक लाखाची मदत देण्याची मागणी पुढे आली असून, राज्याचे मंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

पैठण तालुक्यातील मर्दा गेवराई येथील एका ३८ वर्षीय शेतकरी नाना भिमराव सूर्यनारायण यांनी सोमवारी राहत्या घरी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस घडली आहे. नाना सूर्यनारायण यांना स्वतःच्या मालकीची काही शेती असून, ते स्वतःच्या शेतीसह इतर ठिकाणी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नापिकी यामुळे त्यांच्या शेतातून फारसे उत्पन्न निघत नव्हते. त्यांच्यावर तीन ते चार लाखांचे फायनान्सचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत असून, या फायनान्सवाल्यांनी त्यांना तगादाही लावल्याची गावात चर्चा आहे. याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. दुपारी तीनच्या सुमारास घरातील सदस्य शेतात आल्यानंतर त्यांना सदरील प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी नाना सूर्यनारायण यांना मृत घोषित करून केले. वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण, पोलिस नाईक रविद्र आंबेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!