ChikhaliVidharbha

अंत्री खेडेकर येथे डेंग्युचा रुग्ण?; गावात उडाली खळबळ!

– शासनाचा घरभाडे भत्ता उकळून अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांचे चालते ‘अप-डाऊन’!

चिखली (एकनाथ माळेकर) – अंत्री खेडेकर येथील एका मुलाचा रक्तचाचणी अहवाल डेंग्युसदृश आल्याने गावात एकच खळबळ उडाली असून, या गंभीर प्रकाराबाबत अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांना अद्यापही सीरिअसनेस दिसत नाही. गावात डेंग्युचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी झोपा काढतात काय? असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तातडीने या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे. हे अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे धक्कादायक वास्तवदेखील चव्हाट्यावर आले असून, घरभाडे भत्ताही उकळून शासनाची फसवणूक करत आहे. त्याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे आली असून, आतापर्यंत लाटलेला घरभाडेभत्ता शासनाने व्याजासह वसूल करण्यासाठी आरोग्य विभागाकडे तक्रार करण्याची तयारी ग्रामस्थांनी चालवली होती.

चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे पंचायत समिती चिखली (जि. बुलढाणा) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यक, दोन आरोग्य सहाय्यिका, एक आरोग्य सेवक, तीन बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आदी स्टाफ या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आहे. परंतु बहुतांश कर्मचारी हे बाहेरगावाहून प्रवास करत असल्यामुळे सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर उघडले जात नाही. त्यामुळे गावातील बहुतांश रुग्णांना बाहेरगावी खासगी दवाखान्यांत जावून उपचार घ्यावे लागत आहेत.

अंत्री खेडेकर येथील ग्रामस्थ शेख आसिफ यांच्या मुलाला ताप येत असल्याने, तो मेरा बुद्रुक येथे खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेला होता. तेथील डॉक्टरांनी त्याला चिखली येथील दवाखान्यामध्ये जाण्यास सांगितले. चिखली येथील खासगी डॉक्टरने त्याला तपासून त्याच्या रक्ताचे नमुने तपासले असता, त्याचा अहवाल डेंग्युसदृश आला. त्यामुळे शेख आसिफ यांचे कुटुंबीय घाबरलेले आहेत. या मुलाच्या रक्तपेशीदेखील खालावत चालल्याचे सांगण्यात येते.  डेंग्युसारख्या आजाराचा प्रादुर्भाव हा लवकर होतो. त्यामुळे अंत्री खेडेकरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागच्या वर्षीसुद्धा याच दिवसांमध्ये या गावात डेंग्युचे दोन रुग्ण निघाले होते.  पैकी एका अत्यवस्थ रुग्णाला औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते.  यावर्षी हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात तातडीने धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दरम्यान, याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. बावस्कर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले, की सदर मुलाला डेंग्यु झालेला आहे. परंतु, त्याच्या प्लेटलेट (पांढर्‍या रक्तपेशी) अद्याप चांगल्या आहेत. डेंग्युचा मच्छर चावण्यामुळे हा आजार झाला असून, ग्रामस्थांनी घाबरण्याचे काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. बावस्कर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!