Kokan

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 6 लाख 50 हजार तिरंगाध्वजाचे वाटप

पालघर (जिल्हा प्रतिनिधी) –  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यासाठी सुमारे 6 लक्ष 50 हजार तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले आहेत.  नियोजनबद्ध विकासामुळे पालघर जिल्हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडले, यावेळी जिल्हाधिकारी श्री. बोडके बोलत होते.

यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी संदिप पवार, सुरेंद्र नवले, तसेच जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.  राष्ट्राच्या फाळणीमुळे प्राण गमावलेल्या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी केंद्र शासनाने दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय नागरिकांच्या वर्तमान आणि भावी पिढयांना फाळणीच्या वेळी भोगाव्या लागलेल्या वेदना आणि वेदनांची स्मृती जतन करण्यासाठी जिल्हयामध्ये दिनांक 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीत फाळणी काळातील दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.  आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसेच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पालघर जिल्हयातील मनोर येथे वारली आदिवासी हाट उभारण्याचे काम सुरू आहे.  आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  आदिवासी बांधवांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्हयातील आदिवासी बांधवाना संबोधित करताना केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची पालघर जिल्हयात 100 टक्के अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमे अंतर्गत 21 हजार 652 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून 17 हजार 204 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. तर उर्वरीत लाभार्थ्यांना लाभ देणेबाबतची कार्यवाही सूरू आहे.  मोफत संगणकीय 7/12 वाटप कार्यक्रमांतर्गत जवळपास 2 लक्ष संगणीकृत 7/12 वाटप करण्यात आले आहेत. ई-चावडी प्रकल्पा अंतर्गत तलाठी दप्तराचे (सर्व गाव नमुने) संगणकीकृत करून जमीन महसूलासह सर्व देय शासकीय कर व उपकर निश्चित करून ते ऑनलाईन भरण्याची सुविधा खातेदार नागरिकांना उपलब्ध करुन दिली जाणार असून, सदर प्रणालीचे पूर्व तयारी करीता पालघर जिल्हयातील 8 गावांची निवड करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट महसूल दिनादिवशी ई-पिक पाहणी मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला असून, जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना सदर मोबाईल अॅप अंतर्गत पिकांची नोंद करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी केले.

वनहक्क कायद्यांन्वये जिल्हयामध्ये 49 हजार 518 वैयक्तिक व 446 सामुहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये पालघर जिल्हयात सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो. अमृत सरोवर योजनेंतर्गत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रत्येक जिल्हयात किमान 75 अमृत सरोवर निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयात 89 अमृत सरोवर निश्चित करण्यात आले असून, 41 अमृत सरोवर कामास सुरूवात झाली आहे. 19 अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी आज मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 मध्ये 705 कोटींचा आराखडा मंजुर करण्यात आला असुन, त्यामध्ये 375 नवीन व 205 रेट्रोफिटींग अशा एकूण 580 योजनांचा समावेश आहे. सदर आराखडयातील 489 योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, 320 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर 110 योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. असे जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी सांगितले.

जिल्हयातील कोव्हिड संक्रमण कमी झाले असून, नागरीकांनी लसीकरणाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोव्हिड संक्रमण रोखण्यात आपल्याला यश आले आहे. पालघर जिल्हयातील कोव्हिड लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्रांचे प्रमाण समाधानकारक असून लसीकरणाचा बुस्टर डोस वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आरोग्य विभागामार्फत मनोर येथील ट्रॉमा केअर युनिट व 200 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या आधुनिक रुग्णालयाचे बांधकाम 60 टक्के पूर्ण झाले आहे. पालघर जिल्हयात पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर यांच्यामार्फत किनारपट्टी वरील नागरी घनकचरा साफसफाईसाठी अद्यावत स्वरूपाची मशिनरी केळवे ग्रामपंचायत यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत सुक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, जिल्हयातील इच्छूक लाभार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी केले.

पालघर जिल्हयामध्ये केंद्र शासनामार्फत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीका प्रकल्प (DFCC), विरार-डहाणू रेल्वमार्ग चौपदरीकरण या सारखे महत्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमूळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. आपला जिल्हा सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा असल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर नियोजनबद्ध पद्धतीने मात करुन प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरु असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!