Breaking newsHead linesKokanMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले; अजितदादांनी शरद पवारांबद्दल व्यक्त केली खंत!

– दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज – सुनिल तटकरे
– ‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबीर

कर्जत (रायगड)/ विशेष राजकीय प्रतिनिधी – शपथविधी घेण्याअगोदर आम्ही साहेबांची भेट घेतली त्यांना कल्पना दिली मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले, असा थेट आरोप करतानाच जो घटनाक्रम घडला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जत येथील वैचारिक मंथन शिबीरात सांगितला. दरम्यान, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांना हे सर्व माहित आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. ‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबीर आज पार पडले. याप्रसंगी पवार बोलत होते.

आम्ही दहा – बारा जण देवगिरीला होतो. सुप्रिया सुळे हिला बोलावले आणि आमचा झालेला निर्णय सांगितला. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. सात – आठ दिवसात साहेबांशी बोलून सांगतो म्हणाली. आम्ही थांबलोही मात्र तो वेळ गेल्यावर पुन्हा साहेबांना सांगितले. ठिक आहे म्हणाले. वेळ जातोय निर्णय घ्या सांगत होतो. १ मे रोजी मला बोलावून सरकारमध्ये जावा असे सांगितले. मात्र १ मे रोजी सगळे बाहेर असतात म्हणून मग २ मे ला कार्यक्रम ठरला, साहेबांनी राजीनामा दिला. मात्र त्यावेळी वातावरण वेगळे निर्माण झाले. तर दुसरीकडे काही लोकांना बोलावून राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला सांगण्यात आले. त्यावेळी काही ठराविक टाळकी तिथे होती. मला एक आणि इतरांना वेगळे सांगत होते. ही गोष्ट परिवारातील म्हणून तुम्हाला सांगितले. हे सर्व गाफील ठेवून केले गेले, असेही अजित पवार म्हणाले. २ जुलैला आम्ही घेतलेला निर्णय आवडला नाही तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? सगळे आमदार घेऊन गेलो. चहापान झाला सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्योगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो ना. पक्षासाठी काम करत होतो ना? असा सवाल उपस्थित करतानाच काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष यात्रा काढत आहे आयुष्यात कधी केला नाही आता कशाला संघर्ष करता असा टोलाही नाव न घेता रोहित पवार यांना लगावला. जातनिहाय गणना होणे गरजेचे आहे त्याशिवाय कुणाला किती आरक्षण द्यायचे हे ठरले जाईल. मात्र आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असून शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचाराचा हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे असेही अजित पवार म्हणाले. आज राज्यात काय सुरू आहे याचा विचार केला पाहिजे. कुळवाडी राजा ही उपाधी महात्मा फुले यांनी दिली. कुळवाडी म्हणजे शेतकरी आहे मात्र आज आपण प्रत्येकाला जाती जातीत विभागले आहे. एखाद्या समाजाचा मुलगा पुढे जात असेल तर इतर जातींनी द्वेष का करायचा. हे योग्य नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. प्रत्येकाकडून समाजा-समाजात चितावनी देणारी भाषणे होत आहेत. हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर याला कोण जबाबदार आहे. तरुण, गरीब माणूस यामध्ये भरडला जातो त्याचे आयुष्य उध्वस्त होते. राज्यात दंगली घडत असतील तर हा अजित पवार त्या घडू देणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी गरीबाचे रक्त सांडू देणार नाही असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. कुणाच्या ताटाखालचे मांजर होण्याचे महाराष्ट्राच्या रक्तात नाही. मात्र आज प्रत्येकाची लायकी काढली जात आहे. ही लायकी स्वकर्तृत्वावर तयार होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयात जात नसते आणि जातीचा अहंकार नसतो. पण आज जाती जातीत वाद निर्माण केला जात आहे. एकोप्याने राहिलो तरच विकास होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही मागणी आहे असेही आरक्षण मुद्दयावर बोलताना अजित पवार म्हणाले. वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही आम्ही सगळे करत आहोत. आमच्यात मतभेद नाही. उगाच बातम्या आल्या असेही अजित पवार म्हणाले. निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेईल. आता इथून निघाल्यावर कामाला लागायचे आहे. १२० दिवस शिल्लक आहेत असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
स्वतः ला झोकून देऊन काम करुया एक नवीन इतिहास राज्यात घडवुया असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. आजच्या भाषणात अजित पवार यांनी त्यांना पवारसाहेबांनी कसे गाफील ठेवले आणि सत्तातंराबाबत घडलेला घटनाक्रम सांगून त्यांच्याविरुद्ध येणार्‍या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक लागू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीए विचाराचे निवडून द्यायचे आहेत. बारामती शिरुर रायगड सातारा या खासदारकी आपण लढवणार आहोतच याशिवाय दुसर्‍याही जागा असतील तर शोधून काढा. त्याठिकाणी भाजप, शिवसेनेशी चर्चा करून प्रश्न सोडवू असे अजित पवार म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यावर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसणार आहोत शिवाय घटक पक्षांना सोबत घेऊन जाणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. आता काळ बदलला आहे. आताच्या लोकांच्या भावना काय आहेत. त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या हे बघितले गेले पाहिजे. आपण आपली विचारधारा सोडली नाही. अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले. शंभर टक्के काम पूर्ण करु शकलो नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर किमान समान कार्यक्रम ठेवून काम करावे लागते. काहीवेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र विचारधारा सोडलेली नाही. आपला मुळ पक्ष आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मी विरोधी पक्षनेते पद सोडतो पक्षाची जबाबदारी द्या बोललो होतो याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली. जयंत पाटील यांनी अध्यक्ष पदाबाबत कशी चालढकल केली आणि प्रकाश सोळंके यांना अध्यक्ष पदापासून टोलवाटोलवी कशी केली हा किस्सा सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. एक महिन्यात युवक पदाधिकारी नेमून झाले पाहिजेत. बघतो असे चालणार नाही नाहीतर ३१ डिसेंबरनंतर दुसर्‍यावर जबाबदारी दिली जाईल असे सांगतानाच आता माझ्याबरोबर सगळ्यांना जास्तीचे काम करावे लागणार आहे. सोशल मिडियाचा वापर पुरेपूर केला पाहिजे. नुसत्या बातम्या देऊन पक्ष वाढत नाही तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. संपर्क राहिला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक असले पाहिजे. सर्व घटकांना सोबत घेऊन काम करा. आपला मुळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ३० तारखेला मला निवडले आहे. कोर्ट कचेरीकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले. मी स्पष्ट वक्ता आहे मला छक्के पंजे जमत नाही. सर्वगुणसंपन्न शिकून कोण येत नाही. माझ्यापेक्षा युवक युवती टॅलेंट असेल तर त्यांचेही ज्ञान मी घेतले पाहिजे. कमीपणा वाटून घेऊ नका असा दिलखुलास सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबीर आज पार पडले. युवती संघटनेच्यावतीने’ अजित पर्व युवती सर्व ‘देऊ उभारी घेऊ भरारी युवती आमची कारभारी या भरारी पथकाचा शुभारंभ अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व मंत्र्यांचा सत्कार फुले पगडी व उपरणे देऊन करण्यात आला. वैचारिक मंथन शिबीराच्या दुसर्‍या दिवशी माजी खासदार आनंद परांजपे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष, युवक, युवती, प्रवक्ते, महिला पदाधिकारी आदींनी आपले विचार मांडले. या शिबिराचे सुत्रसंचालन युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले. या वैचारिक मंथन शिबीराला अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, युवक, युवती, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज – सुनिल तटकरे

लोकसभेत एनडीएला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वोच्च स्थानावर दादांना पहायचे असून दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाला आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जतच्या वैचारिक मंथन शिबीरात केले. उद्याच्या भवितव्याची अपेक्षा आम्ही ठेवत असू तर तुम्हीही त्याला सहकार्य केले पाहिजे. युवक, युवती आणि महिलांना राजकारणात सक्रिय करायचे आहे. ज्या महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला त्या महिलांसाठी भविष्यात जास्त जागांवर संधी मिळू शकते असेही सुनिल तटकरे म्हणाले. सत्ता नसताना काय होते हे अनुभवले आणि गेल्या पाच महिन्यात सत्ता आल्यावर काय बदल होत आहे आपण बघत आहोत आता पुढचा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने आपल्याला वाटचाल करायची आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. पुढचे पक्षाचे अधिवेशन म्हणाल त्या ठिकाणी घेऊ मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष द्या. आजच्या शिबीरातून ऊर्जा घेऊन कामाला लागुया असेही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

५८ मोर्चे शांततेत निघाले ना… मग आता जाळपोळ कशाला… बसा एकत्र आणि सोडवा प्रश्न ना! – छगन भुजबळ

हा पक्ष ९९ मध्ये स्थापन झाला या पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होता असे सांगतानाच शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारासोबत जाऊन काम करणार आहोत. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सत्तेत आम्ही गेलो त्याअगोदर उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? भाजपसोबत गेलो तर राग का येतो असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी महायुतीत सहभागी झालो. अडचणीचे प्रश्न एकत्र बसून सोडवत आहोत. न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. यामध्ये आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करायचे आहे. राजकारणातील विरोधक आहोत .शत्रू तर नाही ना …मग शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे असे सांगतानाच जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे तरच आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व घटकांना सोबत घ्यावे लागणार आहे. सर्वसमावेशक मंत्रीमंडळ आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ जे बोलतात तर काय बोलतात तर अजितदादा बोलतात, फडणवीस बोलतात तेच बोलतात… दुसर्‍याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र वेगवेगळे अर्थ काढून षडयंत्र कुणाचे सुरू आहे. आमच्या आमदारांची घरे जाळली गेली… ५८ मोर्चे शांततेत निघाले ना… मग आता जाळपोळ कशाला… बसा एकत्र आणि सोडवा प्रश्न ना… सर्वांना एकत्र बोलवा आणि सांगा… कायदा हातात घेऊन काही करु नका… सरकारला वेठीस धरु नका… त्यात जनतेला वेठीस धरले जाते हे लक्षात घ्या असेही छगन भुजबळ म्हणाले. राज्यकर्ते सर्वांचे असतात म्हणून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मात्र अन्याय होत असेल तर आवाजही उठवला पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे.. उद्योगधंदे आले पाहिजे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, यशवंतराव चव्हाण यांचा आहे त्यामुळे सर्वांना पुढे घेऊन जात आहोत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. ओबीसी जनगणना व्हावी ही मागणी केली आहे. एक राज्य करते तर सगळ्या राज्यांनीही केली पाहिजे. प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. आपल्याला जुन्या मित्रांसोबत आता लढाई करावी लागत आहे असे सांगतानाच ‘न पुच्छो मेरी मंजिल कहा है अभी तो सफर की शुरुवात की है’ … हे शेर ऐकवत छगन भुजबळ यांनी भाषणाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!