बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यात घरकुलाचा लाभ देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांचेकड़ून लाभार्थ्याना पैशाची मागणी केली जात आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. ही आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा गंभीर इशारा गटविकास अधिकारी यांना 30 नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, मेहकर तालुक्यातील काही गावातील सरपंच व ग्रामसेवक रमाई आवाससह इतर आवास योजनेतील घरकुलाचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्याना पाच ते दहा हजार रूपयाची मागणी करतात. परंतु सदर लाभार्थ्यी गरीब असल्याने ते पैशाची मागणी पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे गरजू लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित कनिष्ठ अभियंता यांचेकड़ून स्थळनिरीक्षण करून गरजूंनाच घरकुलाचा लाभ देण्यात यावा. अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन छेड़ण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव भाई कैलास नरवाड़े, योगेश पवार, जीतू माटी, रमेश अवसरमोल, शिवाजी देबाजे, धम्मपाल गवई, सचिन अंभोरे, मोहन गायकवाड़, पी. व्ही. तुरूकमाने आदिंच्या सह्या आहेत.