संग्रामपूर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या पेसोडा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यांच्या खांद्यावर गावाच्या सेवेची धुरा आहे, अशा गावातील आशा कर्मचारी यांच्यासह गावातील सैनिक, शेतकरी, खेळाडू यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचा शाल-श्रीफळ देऊन यावेळी यथोचित व अभिनव पद्धतीने सन्मान करण्यात आला. समाज ज्यांचा ऋणी आहे, अशा नागरिकांच्या या सन्मानाने पेसोडा गावाने आदर्श प्रस्थापित केला होता.
पेसोडा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उल्हासबाऊ इंगळे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात आला. आपण ज्या समाजात राहतो, त्यांचे काही तरी देणे लागतो. या उदात्त भावनेतून आणि समाजऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून, गावातील सैनिक, आशा कर्मचारी, जेष्ठ नागरिक, शेतकरी व खेळाडू यांचा शाल-श्रीफळ देऊन यथोचित मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. हा अनोखा कार्यक्रम सुरु असताना, गावात धो धो पावसाची हजेरी लागली होती. तरीही भरपावसात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. शालेय व्यस्थापन समितीचे अध्यक्ष उल्हासभाऊ इंगळे आणि समिती यांच्या या अनोख्या व स्त्युत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांसह विविध स्तरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. तसेच, सत्कारमूर्तींनीही त्यांचे या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले आहेत.