Kokan

‘अमृत’ ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लोकचळवळ व्हावी – अस्मिता बाजी

– कुडाळ, सावंतवाडी, कणकवली येथे विविध मान्यवरांच्या भेटीगाठी; ‘अमृत’ योजनांचा प्रचार-प्रसार!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या इतर संस्था, विभाग अथवा महामंडळांकडून योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांसाठी राज्य सरकारने ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या स्वायत्त संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन  ‘अमृत’ ही लोकचळवळ बनवावी, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेच्या संचालिका अस्मिता बाजी यांनी केले. महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने पावशी (ता. कुडाळ) येथे आयोजित सिंधुब्रम्ह संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘अमृत’ योजनांची माहिती देताना अस्मिता बाजी बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, जिल्हा उपाध्यक्ष अरूण गोगटे, जिल्हा कार्यवाह सुधाकर देवस्थळी, कुडाळ शाखाध्यक्ष विवेक मुतालिक, नीलेश सरजोशी, सहकार्यवाह अर्चना हर्डिकर, प्रदीप प्रभूदेसाई, सुनील धोंडे, उद्योजक प्रदीप शेवडे, आरती कार्लेकर ,श्रेया कुलकर्णी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी अस्मिता बाजी म्हणाल्या, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, स्वावलंबी उद्योजक/गृहउद्योजक बनविणेसाठी प्रशिक्षण देणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, IIT/IIM व IIIT मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे, कौशल्यविकासातून नोकरीच्या संधी देणे, आदी ‘अमृत’च्या योजना आहेत. अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असेही याप्रसंगी अस्मिता बाजी यांनी सांगितले.


या ब्रम्ह संमेलनाच्या स्तोत्र पठण स्पर्धेचे उद्घाटनही याप्रसंगी अस्मिता बाजी यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमानंतर  त्यांनी समाजातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना ‘अमृत’ योजनांबाबत सविस्तर माहिती दिली, व या योजनांचा प्रचार-प्रसार करावा, अशी विनंती केली. उद्योजक प्रदीप शेवडे, ब्राम्ह युवा मंचच्या कार्यकर्त्या श्रेया कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्या आरती कार्लेकर, नीलेश सरजोशी, पंडित वसंतराव गाडगीळ, सुशील आमोणेकर आदींच्या भेटीगाठी याप्रसंगी पार पडल्या. पावशी, सावंतवाडी, कणकवली येथेदेखील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन अस्मिता बाजी यांनी ‘अमृत’च्या विविध योजनांची सविस्तर माहिती विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली.

नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ भीषण अपघात; सहा ठार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!