Breaking newsHead linesMaharashtraNAGARPachhim Maharashtra

नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ भीषण अपघात; सहा ठार

– विचित्र अपघातात ठाणेहून मेहकरकडे येणार्‍या बसने उडविले!

नगर (बाळासाहेब खेडकर) – नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ झालेल्या विचित्र व भीषण अपघातात पाच जण जागीच तर एक जण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. आज (दि.२४) पहाटे अडिच वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा हा विचित्र अपघात घडला. आणखी काहीजण जखमी असून, त्यांच्यावर नगर येथे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे-मेहकर बसने उडविल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास पारनेर पोलिस करत आहेत.

सविस्तर असे, की ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी या तीन वाहनांत ढवळपुरी फाट्याजवळ पहाटे २.३०च्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने नजीकच्या भाळवणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून नगर येथे हलविण्यात आले होते. या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तर, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या महामार्गावर आज पहाटे एक उसाचा ट्रॅक्टर पलटी झालेला होता. त्याला मदत करण्यासाठी काहीजण या ठिकाणी आले होते. त्याचवेळी नगर-कल्याणच्या दिशेने भरधाव येणार्‍या ठाणे-मेहकर या बसचे नियंत्रण सुटल्याने तिने मदत करणारे व्यक्ती तसेच समोरच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. जागीच ठार झालेल्या व्यक्तींचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयामधे शवविच्छेदनासाठी पाठवले गेले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्ताना तातडीने मदत केली. घटनास्थळी वाहतूककोंडी झाली होती, त्यामुळे पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरूळीत केली. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. या दुर्देवी घटनेतील पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले होते, तर एका गंभीर जखमीचा नगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला होता.


या घटनेतील मृतांची नावे – 
१. नीलेश रावसाहेब भोर – दसवडे
२. जयवंत रामभाऊ पारधी – जांबुत खुर्द
३. संतोष लक्ष्मण पारधी – जांबुत खुर्द
४. प्रकाश रावसाहेब थोरात – वारणवाडी
५. सचिन कांतीलाल मंडलेचा – टाकळी मानूर
६. अशोक चिमा केदार – जांबुत खुर्द
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!