चिखली (एकनाथ माळेकर) – सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, आणि देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या प्रत्येकाचा सन्मान होत आहे, आणि ऐतिहासिक वारसा जपलेल्या ठिकाणी राष्ट्रध्वज सन्मानाने फडकविल्या जात असतांना चिखली शहरातील मुख्य आणि शहराचा इतिहास ओंजळीत धरलेल्या ‘राजा टॉवर’ हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास मुकला का? असा प्रश्न याकडे बघून होत आहे. चिखली नगरपालिकेला या टॉवरवर रोषणाई तर सोडा साधी रंगरंगोटीही करण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी ‘राजा टॉवर’ म्हंटले की मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, कार्यक्रम, आयोजन डोळ्यासमोर असायचे. याच ठिकाणी पंचक्रोशीतील, राज्यातील आणि देशात प्रतिनिधित्व करणारी मंडळींनी इथे हजेरी लावलेली आहे. हाच ‘राजा टॉवर’ चिखलाच्या विकासातील महत्वाचा साक्षीदार आहे आणि आज जिथे देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर करत आहे, तेव्हा याच ‘राजा टॉवर’ला रोषणाई तर सोडा साधी रंगरंगोटीसुद्धा करण्यात आलेली नाही. देशभरात महत्वाच्या वास्तुना थाटात सजवल्या जात असतांना हाच ‘राजा टॉवर’ आज चिखलीकरांना अमृत महोत्सव साजरा करतांना गपगुमान पणे बघत आहे. सांगावे तर कुणाला.? ऐकणारा आता कोण.? इतिहास लिहिले मी, त्यास वाचून आठवणार आज कोण..? या भावनिकतेने आज तो नक्की नाराज जरी असला तरी शहराचा मान व सन्मान राखून आहे, हे मात्र नक्की…!!