Buldana

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बोर्डे यांचे निधन

राजेंद्र काळे
बुलडाणा – दैनिक अजिंठा, गावकरी व महानगर या वृत्तपत्रांसाठी जिल्हा प्रतिनिधी तर जनवाद, नागपूर पत्रिका व तरुण भारत या वृत्तपत्रांसाठी धाड वार्ताहर म्हणून काम केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बोर्डे यांचे किडनी विकाराने आज, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता धाड येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, २ भाऊ, १ बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

प्रमोद बोर्डे हे पत्रकारितेत व स्थानिक राजकारणात एक गाजलेले नाव होते. त्यांच्या मातोश्री जिजाबाई बोर्डे यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनीही दोन वेळा ग्रामपंचायतच्या निवडणूकीत विजय मिळवला होता, सलग ११ वर्ष ते धाड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शिक्षण समितीचे अध्यक्ष राहिले. त्यांचा बुलडाणा जिल्ह्यात फार मोठा मित्र परिवार होता. प्रशासकीय पातळीवरसुध्दा त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आजारी असतांनाही सोशल मीडियावर ते सक्रिय होते, त्यांच्या पोस्ट जुन्या आठवणींना उजाळा देणार्‍या असायच्या. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातही फार मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता धाड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे बंधू महेंद्र बोर्डे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!