‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांचा सन्मान व विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री गुरूवारी बुलढाण्यात!
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकार्यांनी घेतला आढावा
– काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केल्यास जागीच गाडणार – संजय गायकवाड यांच्या धमक्या सुरूच!
– सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी – डॉ. किरण पाटील
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा गुरूवारी (दि.१९) शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेला दिलेल्या जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. दरम्यान, त्यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा बारकाईने आढावा घेतला. दुसरीकडे, आ. संजय गायकवाड यांना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आज बोलताना संजय गायकवाडांची जीभ पुन्हा घसरली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जागीच गाडण्यात येईल, अशी धमकीची भाषा त्यांनी वापरली.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज आढावा घेऊन सरकारी यंत्रणेला जबाबदारीचे वाटप केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिघोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एम. बसैय्ये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारीप्रमाणे संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून चोखपणे काम करून घ्यावे. कोणत्याही विभागाला आपल्या कामाविषयी शंका असेल तर त्याचे निरसन तात्काळ करून घ्यावे. कार्यक्रमस्थळावर तीस ते चाळीस हजार लाभार्थी येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने त्यांच्या बसण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्याप्रकारे करा. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. तसेच कार्यक्रम स्थळावर येणार्या महिला लाभार्थ्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी. सर्व संबंधित विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून मेळावा व्यवस्थितपणे पार पडेल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थी आणले जाणार आहेत, त्यासाठी लाभार्थ्याच्या संख्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याला बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लाभार्थी व्यवस्थितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील व त्यानंतर ते व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचतील, याचे योग्य नियोजन करावे. लाभार्थ्यांना घेऊन येणार्या बसेसची पार्कींग व्यवस्था डी.एड. महाविद्यालय मैदान व जिजामाता महाविद्यालय मैदान येथे तर खाजगी वाहनासाठी जिजामाता महाविद्यालय मैदान व आयटीआय कॉलेजच्या बाजूकडील प्रांगणात करण्यात आली आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन पार्कींग व्यवस्था होमगार्ड मैदान येथे करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळावर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा संबंधित विभागाने पुरवाव्या. कार्यक्रम सोहळाकरीता येणार्या महिला भगिनींना कोणतही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.—-
शहीद जवान युद्ध स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार उद्घाटन
बुलढाणा येथील मुठ्ठे ले-आऊट येथील शहीद जवान युध्द स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांनी लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
—–
मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणार्या वाहतूक मार्गात बदल
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा दि.१९ सप्टेंबररोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा शहराकडे मलकापूर, नांदुरा, धाड व चिखलीकडून येणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे. बुलढाणा शहराकडे येणारी जड वाहतुकीमुळे अपघात किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मलकापूर, नांदुरा, धाड व चिखलीकडून येणारी सर्व वाहतूक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. मलकापूर व मोताळाकडून येणारी वाहतुक नांदुरा-खामगाव-चिखलीमार्गे जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच नांदुराकडून येणारी वाहतूक खामगांव-चिखलीमार्गे-जालना या पर्यायी मार्गाने, चिखलीकडून येणारी वाहतूक चिखली-खामगांव-नांदुरा मलकापूर या पर्यायी मार्गाने तर धाड व अजिंठाकडून येणारी व मलकापूरकडे जाणारी वाहतूक धाडनाका-सरक्युलर रोड-त्रिशरण चौक ते चिखली किंवा खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.