Pune

पुण्यातील बिल्डरने ‘अमेनिटी स्पेस’वर उभारली बहुमजली बिल्डिंग!

– ओपन आणि अमेनिटी स्पेसचा नियम धाब्यावर बसविला!

याच नोटरी कागदपत्रांच्या आधारे पुन्हा लेआउट रिवाईस करण्यात आले.

पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पुण्यातील एका बिल्डरने चक्क ओपन स्पेस व अमेनिटी स्पेसचे नियम धाब्यावर बसवित, अमेनिटी स्पेसची जागा पुणे महापालिकेकडे न देता, त्यावर बहुमजली इमारत बांधल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रकाराला पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांनी अर्थपूर्ण दृष्टिकोनातून कानाडोळा तर केलाच; पण नुसत्या खोट्या नोटरी पत्राच्या आधारे मान्यतादेखील दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकारात कोट्यवधींची ‘डील’ झाल्याची शक्यता निर्माण झाली असून, याप्रश्नी काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयात धाव घेणार असल्याची माहितीही ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आली आहे.
सद्या शेतजमिनींचा मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारतींसाठी वापर होऊ लागला असून, त्यासाठी शेतजमिनी या बिल्डर नॉन एग्रीकल्चर (एनए) करून बहुमजली इमारती बांधू लागले आहेत. पुणे शहरातील सर्वे नंबर ३८, ३९ व ४२ कोथरूड येथे उत्कृष्ठ वास्तू रचनाकार यांच्या संकल्पनेतून वन बीएचके, टू बीएचके व थ्री बीएचके अशा सदनिका बांधून विकल्या गेल्या आहेत. या वास्तूरचनाकाराच्या लेआउटमधील अमेनिटी स्पेस ९६० स्क्वेअर मीटर, ओपन स्पेस ६४० स्क्वेअर मीटर हे पुणे महानगरपालिका यांना हस्तांतरित न करता, खोट्या नोटरी कागदपत्रांच्या आधारे पुन्हा लेआउट रिवाईस करण्याचा धक्कादायक प्रकार संबंधित बिल्डरने केलेला आहे. विशेष म्हणजे, या प्रकारावर त्याने सर्व अधिकारी वर्गाचा पॉझिटिव्ह शेरादेखील मिळवला आहे.
या बिल्डिंगमधील अमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेस या जागा महापालिकेला न दिल्यामुळे, आता मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, या अमेनिटी स्पेसवर बिल्डरने बहुमजली इमारत बांधून बक्कळ पैसा कमावला आहे. आणि, या धक्कादायक प्रकारात महापालिकेचे संबंधित अधिकारीदेखील सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदीप पेठे व प्रा. गोलगिरे या पुण्यातील नागरिकांनी सांगितले, की नवीन एनए ऑर्डरला युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमन नियम लागू असून, ४० गुंठे किंवा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट असेल तर इमारतीच्या लेआउटमध्ये दहा टक्के ओपन स्पेस आणि अमेनिटी स्पेस १५ टक्के लेआऊट सोडावा लागतो. परंतु, या बिल्डरने संबंधित अधिकार्‍यांच्या मदतीने हे नियम धाब्यावर बसवले आहेत.


याबाबत राज्य सरकारकडे तक्रार दाखल करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आले असून, या बिल्डरविरोधात ते न्यायालयातदेखील धाव घेणार आहेत. या नियमांचा आधार घेतला तर संबंधित बिल्डरला अमेनिटी स्पेसवर बांधलेली इमारत पाडावी लागणार आहे. वास्तविक पाहाता, ओपन स्पेस आणि अमेनिटी स्पेसमध्ये बिल्डिंग झाल्यामुळे मुलांना खेळायला मैदाने उरणार नाहीत. बिल्डरच्या हावरटपणामुळे आणि प्रशासनाच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे विविध क्रीडा प्रकार खेळायला मैदान शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पुणेकरांमधून या बिल्डरविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!