तरूणांनी गिरीराज सावंत यांचा आदर्श घ्यावा – श्रीमंत कोकाटे
- कात्रज येथे 'कार्यसिद्धी प्रतिष्ठान'चे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांना साजरा
– गिरीराज सावंत यांनी दक्षिण पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे – मान्यवरांचा सूर
पुणे – एका अभिमत विद्यापीठाचा प्रमुख, अनेक साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्थांचा प्रमुख, राज्याच्या मंत्र्यांचा मुलगा असे सारे वैभव असतानाही अतिशय विनम्रता, विनयशीलता, आणि निव्वळ समाजसेवेचे वेड असलेले गिरीराज तानाजीराव सावंत हे व्यासंगी आणि संतविचारांचे अनुकरण करणारे अभ्यासू व कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व आहे. आजच्या बिघडत चाललेल्या तरूणपिढीने त्यांच्याकडे पाहून शिकावे, त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, इतिहासतज्ज्ञ शिवश्री श्रीमंत कोकाटे यांनी केले. कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक, जेएसपीएम ग्रूपचे उपाध्यक्ष, टीएसएसएम ग्रूपचे सचिव आणि भैरवनाथ शुगर्सचे संचालक गिरीराज तानाजीराव सावंत यांचा अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि.२४) कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठान येथे साजरा झाला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात आलेत. त्याप्रसंगी श्रीमंत कोकाटे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला विजूशेठ जगताप, अप्पासाहेब रेणुसे, चंद्रकांत सरडे, अनंतराजे शिर्के, दिगंबर डवरी, शंकर कडू, राकेश पवार, अशोक हरनावळ, नाना निवंगुणे, रेवाअण्णा गाडेकर, रावसाहेब कुंजीर, चांदभाई मनुरे, मारूती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गिरीराज सावंत यांचे अभीष्टचिंतन करताना श्रीमंत कोकाटे म्हणाले, की आदर्श नेत्याची पाळेमुळे ही लोकसंग्रहात दडलेली असतात. गिरीराज सावंत यांचा लोकसंग्रह दांडगा असल्याने त्यांचे नेतृत्व अधिकाधिक उजळून निघणारे आहे. लोकांशी जुळलेले नेतृत्वच लोकमान्यता पावते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या स्वयंभू व उदंड लोकसंग्रह असलेल्या नेत्यांचा वारसा चालविण्याची जबाबदारी गिरीराज यांच्यावर आहे, आणि ती ते वडिलांच्या एक पाऊल पुढे जाऊन पार पाडत आहेत. प्रचंड वाचन, व्यासंग आणि लोकाभिमुखता ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. गोरगरिबांच्या हाकेला धावून जात असताना त्यांच्यातील हळवे माणूसपण दिसून येते. कमालीच्या संवेदनशील अशा या तरूण नेतृत्वाने आपला वाढदिवस इतरांसारखा ओंगाळवाणा साजरा न करता, विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. आजकालची तरूणपिढी दिशाहीन झाली असताना, या पिढीने गिरीराज सावंत यांच्याकडून आदर्श घ्यावा. गिरीराज यांची विनयशीलता, ऋजुता, व्यासंग, आणि समाजसेवेची तळमळ हे गुण या तरूणपिढीने अवश्य घ्यावे, असे आवाहन श्रीमंत कोकाटे यांनी तरूणपिढीला या कार्यक्रमातून करत, गिरीराज सावंत यांचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी विचारपीठावरील मान्यवर, अनंतराजे शिर्के, अप्पासाहेब रेणुसे, दिगंबर डवरी, हरिष देशमाने, शंकर कडू, कुमार पाटील आदींनीदेखील गिरीराज सावंत यांचे अभीष्टचिंतनपर आपले विचार व्यक्त केले. अनेक श्रीमंतांची मुले रस्त्यावरील गोरगरिबांना आपल्या गाड्यांखाली चिरडत असल्याच्या बातम्या माध्यमांतून वाचायला मिळतात. परंतु, गिरीराज सावंत यांच्यासारख्या मंत्र्यांचा मुलगा आणि शैक्षणिक, औद्योगिक साम्राज्याचा धनी असलेला तरूण मात्र रस्त्यावर जाऊन गोरगरिबांच्या उपाशीपोटात मायेचे दोन घास दररोज खाऊ घालतो, यातून सावंत कुटुंबीयांचे आपल्या तरूणपिढीवर असलेले अध्यात्मिक, मूल्याधिष्ठीत संस्कार तर दिसून येतातच; परंतु गिरीराज सावंत यांचेही समाजसेवेचे वेड दिसून येते. त्यांच्यासारख्या उच्चशिक्षित, संस्कारी, आणि विनयशील तरूणाने आता दक्षिण पुण्याचे नेतृत्व करावे; त्यासाठी नगरसेवक म्हणून पुण्याच्या महापालिकेत पोहोचले पाहिजेत, अशी अपेक्षा या मान्यवरांनी व्यक्त केली. त्याला उपस्थित जनसमुदयाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले.
आपल्या अभीष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना गिरीराज सावंत म्हणाले, की कृतीशील समाजसेवेचे बाळकडू आम्हाला घरातून, वडिलधार्यामंडळीकडून मिळालेले आहेत. आणि, आम्ही शेवटपर्यंत समाजसेवेतच राहू. गोरगरिबांच्या सेवेचीच संधी देवाने आम्हाला द्यावी, ही प्रार्थना आम्ही करत आहोत. आजच्या काळात मानव गतिमान आणि प्रगतीमान झाला हे खरे आहे, पण या काळात समाजाची स्थिती काय आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. अनेक लोकं उपाशीपोटी आणि गरिबीत दिवस काढत असतील तर, प्रगती झाली असे खरोखर म्हणता येईल का? म्हणून कार्यसिद्धी प्रतिष्ठान हे मानवसेवेचे मंदीर येथे उभे केले आहे. सत्कर्माला येथे कृतीची जोड देऊन लोकांच्या सेवेची कामे पुढील शंभर वर्षेदेखील करत राहू, तसे बळ आम्हाला ईश्वराने देवोत. वाढदिवस सत्कारणी लावण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने अंध, दिव्यांग, पीडित, गोरगरिबांसाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. कृतीशील समाजसेवेवर आमचा भर असून, ही कृतीशील समाजसेवा सदोदित करतच राहू, असे याप्रसंगी गिरीराज सावंत यांनी सांगून, अभीष्टचिंतनाचा वर्षाव करणार्या मान्यवरांचे आभार व्यक्त केलेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून कार्यक्रमाची रूपरेषा अॅड. दिलीप जगताप यांनी विषद केली. तर उपस्थितांचे आभार कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्यावतीने कुमार पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, तिरूपती मैत्री कट्टा, ऑरा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर, भ्रमंती ग्रूपचे पदाधिकारी व सदस्य, चैतन्य हास्य ग्रूप, श्रीराम योगसाधना ग्रूप, अमर देशमुख, सनी काळे, अनिकेत हिप्परगीकर, आशीर्वाद शिंदे, संजय शिंदे, आतीष जाधव, अजय हांडे, मंगेश भोसले, सागर खुटवाड, संग्राम थोरात, सागर सोनवणे आदींसह कात्रज परिसरातील नागरिकांसह विविध सोसायट्यांचे चेअरमन, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.