Head linesPachhim MaharashtraPune

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे अखेर निलंबित!

चाकण (विशेष प्रतिनिधी) – खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करत, तसेच खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून दिवसे हे मानसिक छळकरत आहे, असे आरोप करत निवडणूक आयोगाला कट्यारे यांनी पत्राद्वारे तक्रार केली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहाराद्वारे बिनबुडाचे आरोप केल्याने जनमाणसात शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. यावरुन कट्यारे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कट्यारे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

याबाबतचे आदेश शासनाचे अपर सचिव संजीव राणे यांनी काढले आहे. लोकसभा मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी संगनमताने काम करत असल्याचा आरोप कट्यारे यांनी केला होता. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे प्रधान सचिव, महसूल सचिव यांना थेट पत्र पाठविले होते. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पदभार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढून घेतला होता. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कट्यारे यांच्याबाबत शिस्तभंग केल्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून २० जूनरोजी कट्यारे यांना महसूल विभागाकडून नोटीस पाठवून आठ दिवसात लेखी उत्तर मागविले होते. मात्र कट्यारे यांनी नोटीस नाकारली व कुठलेच उत्तर दिले नसल्याने शुक्रवारी त्यांच्यावर गैरवर्तवणुकीचे दोषारोप निश्चित करून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण…?
लोकसभा निवडणुकीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा मजकुराचे पत्र थेट निवडणूक आयोगाला पाठवले होते. यामुळे दोन उच्चपदस्थ अधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पत्रात कट्यारे यांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावरही आरोप केले होते. मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून दिवसे मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी तक्रार केली होती. निवडणूक असतानाही पुणे रिंग रोडच्या कामात गुंतवून ठेवले. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!