सन्मान भूमिपुत्राचा!; बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा उद्या सपत्नीक नागरी सत्कार सोहळा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – केंद्रीय मंत्रिपदावर पोहोचलेले बुलढाण्याचे पहिलेच भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांचा बुलढाणेकरांच्यावतीने रविवारी (दि.३०) धाड नाका येथील ओंकार लॉन येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या भूमिपुत्राची पहिल्यांदाच झालेली केंद्रीय मंत्रिपदी निवड ही जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे, याच गौरवांकित क्षणासाठी या नागरी सत्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी केलेले आहे.
केंद्रीय आरोग्य व आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा, या भव्य अशा नागरी सत्कार सोहळ्यात सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. प्रतापरावांसह त्यांच्या पत्नी सौ. राजश्रीताई जाधव यांचाही यावेळी नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, तर माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख, आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपतराव सावळे, माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलढाणा अर्बन परिवाराचे प्रमुख राधेश्याम चांडक यांच्याहस्ते प्रतापराव जाधव व सौ. राजश्रीताई जाधव यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास गोकुळ शर्मा, मुख्त्यारसिंह राजपूत यांची आशीर्वादपर उपस्थिती लाभणार असून, योगेंद्र गोडे, विजय अंभोरे हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त प्रतापराव जाधव यांच्याहस्ते सपत्नीक ग्रामदैवत जगदंबा माता यांचे महापूजन होणार असून, सकाळी १० वाजता प्रतापगड कमानीपासून भव्य रॅली निघणार आहे. दुपारी १०.३० वाजता कारंजा चौकात भारतमाता पूजन होणार असून, तेथे तब्बल ५१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. संगम चौकातील शिवस्मारक येथे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाआरती होणार असून, साडेअकरा वाजता मुख्य नागरी सत्कार सोहळा सुरू होणार आहे.
——–
दरम्यान, या कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण आयोजन समितीच्यावतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनाही देण्यात आले होते. परंतु, या दोन्हीही नेत्यांनी नागरी सत्कार समितीस कोणताही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती हाती आली आहे. पक्षीय राजकारण बाजूला सारून भूमिपुत्राची केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच लागलेली वर्णी, या दृष्टीने या कार्यक्रमाकडे पाहून, या दोन्हीही नेत्यांनी या कार्यक्रमास जाणे अपेक्षित होते. परंतु, या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून आपल्या डोक्यात चोवीस तास फक्त राजकारणच राहते, असे संकेत हे दोन्हीही नेते आपल्या या कृतीतून देत आहेत, अशी चर्चा आहे. वास्तविक पाहाता, तुपकर व खेडेकर हे दोन नेते या कार्यक्रमाला गेले तर लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली कमालीची कटुता दूर होण्यास हातभार लागला असता, अशीही चर्चा बुलढाण्यात रंगताना दिसून आली.
————–