BULDHANAHead linesVidharbha

भक्ती महामार्गाच्या नावाखाली शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करू नका; अन्यथा रक्ताचे पाट वाहतील!

– भक्तीमहामार्गविरोधी लढ्यात आता रविकांत तुपकरांची एण्ट्री!
– भक्ती महामार्गाच्या नावाखाली शेतकर्‍यांना भूमिहीन करून त्यांचे संसार उघड्यावर आणू नका : रविकांत तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सिंदखेडराजा ते शेगाव या प्रस्तावित भक्ती महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गावरील ४५ गावातील शेतकर्‍यांनी या मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहे, आधीच समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाले आहे. कोणाचीही मागणी नसतांना शेतकर्‍यांच्या मुळावर उठणारा या मार्गाचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित करत, विकासाच्या नावाखाली शेतकर्‍याचे संसार उघड्यावर आणू नका, शेतकर्‍यांना भूमिहीन होण्यापासून वाचविण्यासाठी हा मार्ग रद्द करा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तर शेतकर्‍यांच्या आंदोलनात आम्ही आक्रमकपणे सहभागी असून जबरदस्ती शेतकर्‍यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला दिलेले पत्र.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्ति महामार्ग प्रस्तावित असून, १०९ किलोमीटरचा हा मार्ग आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. परंतु या मार्गावरील ४५ गावातील गावकरी व शेतकर्‍यांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. तातडीने हा मार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी आंदोलने ही सुरु झाली आहे. वास्तविक पाहता, सिंदखेडराजा ते शेगाव हे अंतर अंदाजे २४० किलोमीटरचे आहे. सिंदखेडराजा ते मेहकर समृद्धी महामार्गाचा उपयोग करून मेहकर एन्टरचेंजपासून शेगाव केवळ तीन तासात पोहोचता येते. तसेच सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे भक्तीमार्गाची कुठल्याही प्रकारे कोणाचीही मागणी नाही. वास्तविक भक्ती महामार्गामुळे हजारो शेतकर्‍यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहीत होणार आहेत. त्याचबरोबर अनेकांची पक्के घरे, विहिरीसुद्धा जाणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. तसेच अनेकजण बेघर होणार आहेत. आधीच समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यातच आता हा भक्तिमार्ग शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या भक्ती मार्गाला तीव्र विरोध केला आहे. शेतकर्‍यांच्या भावनांशी आम्हीही सहमत आहोत. शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देऊन भक्ती महामार्ग उभा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर प्रस्तावित भक्तीमार्ग तातडीने रद्द करून शेतकर्‍यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, तातडीने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास आम्हीदेखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरू, जर जबरदस्ती शेतकर्‍यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील, असा सूचक इशाराही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला दिला आहे.
————–

शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनात राजू शेट्टी तर भक्तीमहामार्गाच्या आंदोलनात उतरले रविकांत तुपकर!

कोल्हापूर ते नागपूर असा जाणार्‍या शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार विरोध होत आहे. त्यात शेतकरी नेते राजू शेट्टी हेदेखील उतरले आहेत. त्यामुळे हा महामार्ग स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. त्याच पृष्ठभूमीवर सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाच्या विरोधात आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील उतरले आहेत. त्यामुळे हा महामार्ग रद्द झाला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलने बघायला मिळणार आहेत. यापूर्वी महामार्गविरोधी कृती समितीच्या नेतृत्वात हा महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलने सुरू होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईकदेखील या आंदोलनात सहभागी आहेत. परंतु, आता रविकांत तुपकर हे आंदोलनात उतरल्याने या आंदोलनाला आता धार येणार आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!