चिखली तालुक्यातील एक लाख ९७ हजार लाभार्थ्यांना रेशन मिळणे होणार मुश्कील!
– उद्यापर्यंत रेशन दुकानांमध्ये विशेष मोहीम; लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांपैकी एक लाख ९७ हजार ०९३ इतक्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी न केल्याने त्यांचा रेशन पुरवठा धोक्यात आला आहे. या लाभार्थ्यांनी आज व उद्या (दि.२९ व ३० जून २०२४) रोजी महसूल प्रशासनाच्यावतीने आयोजित विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपली ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा शासन नियमाप्रमाणे रेशन धान्य मिळणार नाही, असे आवाहन चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी केलेले आहे.
चिखली तहसीलदारांचे निवेदन वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
याबाबत माहिती देताना तहसीलदार काकडे यांनी सांगितले, की चिखली तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांपैकी एक लाख ९७ हजार ९३ लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. रेशनकार्डमधील सर्व लाभार्थ्यांचे ई-केवायसी आधार प्रमाणिकरण दिनांक ३० जूनपर्यंत करणे शासनामार्र्पâत बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या हितासाठी चिखली तालुक्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये २९ व ३० जूनरोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित रेशन दुकानात जाऊन रेशन दुकानदारांना आपले आधारकार्ड देऊन आपली ई-केवायसी करून घ्यावी. कार्डावर नमूद ग्राहकाची ई-केवायसी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल. अपडेट झाल्यानंतरच त्यांचे ई-केवायसी होईल. सद्या प्रत्येक रेशन दुकानात लाभार्थ्यांच्या हितासाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे, त्याचा लाभ घ्यावा. लाभार्थ्याने ई-केवायसी न केल्यास व लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही तहसीलदार संतोष काकडे यांनी कळवले आहे. त्यामुळे लाभार्थी गोरगरिबांनी तातडीने आपली ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
————-