– पीडित व्यक्ती मंठा तालुक्यातील माळेगावचा रहिवासी; रायपूर पोलिसांत गुन्हे दाखल, अटकेची टांगती तलवार!
चिखली (महेंद्र हिवाळे) – दारूचे व्यसन लागल्याने ते सोडविण्यासाठी घाटनांद्रा येथील धारेश्वर संस्थान येथील शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज यांच्याकडे गेलेल्या एका व्यक्तीच्या चांगल्याच कानफट्ट्या हे शिवा महाराज शेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी गंभीर दखल घेऊन पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून शिवा महाराज यांच्याविरोधात शनिवारी रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडीओ सायबर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले होते. या प्रकरणाची पडताळणी केल्यावर, व्यक्तीची ओळख पटल्यावर चौकशीअंती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेशसिंग राजपूत यांनी ‘व्हिडीओ’मधील अमानुष मारहाण झालेल्या इसमाची ओळख पटवत, त्याला रायपूर पोलिस ठाणे येथे बोलावून घेतले असून, त्याच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करून घेतली आहे, व या महाराजाविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. अमानुष मार सहन करणारा इसमाचे नाव राजेश श्रीराम राठोड (वय ३६) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच तो जालना जिल्ह्यातील माळेगाव (तालुका मंठा) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (दिनांक २९) संध्याकाळी राजेश राठोड याने रायपूर पोलीस ठाण्यात प्रकरणाची रीतसर तक्रार दिली. प्रकरणी रायपूर पोलिसांनी आरोपी शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज (राहणार घाटनांद्रा शिवार, तालुका बुलढाणा) याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३ आणि २९४ नुसार गुन्हे दाखल केले आहे.
दरम्यान, घाटनांद्रा येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिवा बरडे महाराज दारू सोडविण्याच्या नावाखाली उपचार म्हणून व्यसनी इसमास अमानुषपणे मारहाण करतात. या गावानजीक जंगल परिसरात त्यांचा हा आश्रम आहे. अगरबत्ती, धुपचा धूर, समोर बसलेल्या (राजेश राठोड) अमानुष मारहाण करणारी व्यक्ती, त्याच्या मागे ही मारहाण मौनपणे सहन करीत बसलेले सोयरे, श्रद्धावान (?) विनम्र भक्तमंडळी असे चित्रफीतमधील चीड आणणारे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यात ’दारू सोड, दारू सोड’ष्ठ म्हणत शिवा महाराज हे त्या युवकाला बेदम मारहाण करत होते. दणकट शरीराच्या, तगड्या तुगड्या बाबाच्या बेदम मारहाणीने उपचारासाठी बसलेली व्यक्ती चांगलीच ‘घायाळ’ झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तो बाबाच्या तडाख्यातून वाचण्याची कोविलवाणी धडपड करतो, मात्र अनेकदा ते प्रयत्न असफल ठरतात. एकदा ‘तो’ सफल ठरतो तर सोबतची एक व्यक्ति त्याला पुन्हा बाबाच्या स्वाधीन करतो. यामुळे संतापलेला बाबा त्याला पुन्हा धु धु धुवून काढतो. तो बिचारा बाबाचे पायपडून विनवणी करतो, पण निर्दयी बाबाला तरी दया येत नाही. त्याची मारहाण सुरूच राहते, असे चित्रफीतमध्ये दिसत होते. सुमारे दीड मिनिटाच्या या चित्रफितीतील हा सर्व प्रकार अमानुषतेचा कळस गाठणारा अन अंधश्रद्धा चा कळस होता.
————–