मंत्री होईल असे स्वप्नातही वाटले नाही; जिल्हा विकासाची घोडदौड सर्वांच्या सहकार्याने पुढेही चालूच राहील : प्रतापराव जाधव
– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या भव्य स्वागताने दुमदुमली बुलढाणा नगरी
– विकास पाहिजे असेल तर विरोधकांनीही अंतःकरण उदार ठेवावे; प्रतापरावांचा राजकीय विरोधकांना सल्ला!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत काम सुरू केले तेव्हा शिवसेना सत्तेत येईल व आपण मंत्री होऊ, असे स्वप्नातही वाटले नाही. वैयक्तिक काहीही अपेक्षा नव्हती; पण लोकांसाठी काम करत गेलो. जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड सर्वांच्या सहकार्याने पुढेही चालूच राहील. आणि, विकास पाहिजे असेल तर अंतःकरण उदार ठेवण्याची भूमिका विरोधकांनीही ठेवावी, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व आयुष स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. बुलढाणा जिल्ह्याच्या मातीत जन्माला आलेला भूमिपुत्र पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाल्यामुळे जिल्हा नागरी सत्कार सोहळा समितीच्यावतीने प्रतापरावांचा बुलढाणा येथे सर्वपक्षीय भावपूर्ण नागरी सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
‘प्रतापगड’ स्वागत कमानीवर क्रेन अन् जेसीबीच्या सहाय्याने गुलाब पाकळ्यांनी उधळण करत, केंद्रीयमंत्री बनल्यावर पहिल्यांदा जिल्हा मुख्यालयी आलेल्या प्रतापराव जाधव यांचे दिमाखात झालेले स्वागत, ग्रामदेवता जगदंबेची महापूजा, कारंजा चौकात भारतमाता पूजन, जयस्तंभ चौकात स्वागताचा अभूतपूर्व जल्लोष, शिवस्मारकावर महाराजांची महाआरती.. ठीकठिकाणी मंत्री महोदयांचे उस्फूर्त स्वागत होत होत ओंकार लॉनवर पोहोचताच पोलीस बँड पथकाने ‘जयोस्तुते..’ या मंगलगीताने दिलेली सलामी, नंतर झालेला अभूतपूर्व नागरी सत्कार.. अशा क्रमाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या स्वागताने बुलढाणानगरी दुमदुमून गेली होती. अपेक्षा न ठेवता राजकारणात आलो, अपेक्षेपेक्षा खूप मिळाले. आता केंद्रात राज्यमंत्री मिळाल्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करू, अशा भावना सत्काराला उत्तर देताना ना. जाधव यांनी व्यक्त केल्या. केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नामदार प्रतापराव जाधव यांचे रविवार, दिनांक ३० जूनरोजी आगमन झाले असता, बुलढाणा नागरी सत्कार समितीच्यावतीने त्यांच्या भव्य सत्कार आयोजित केला होता. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड तर बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, ‘बारोमास’कार प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्याहस्ते मुख्य सत्कार संपन्न झाला. यावेळी मंचावर आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार विजयराज शिंदे, धृपदराव सावळे, हर्षवर्धन सपकाळ व डॉ. शशिकांत खेडेकर, काँग्रेस नेते विजय अंभोरे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोकुळ शर्मा व मुख्त्यारसिंह राजपूत, माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, युवासेनेचे नेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत व शांताराम दाणे, भाजप नेते योगेंद्र गोडे तथा सत्कार समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती.
आरंभी प्रस्ताविकातून सत्कार सोहळ्याचा आयोजनासाठी भूमिका समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी विषद केली. प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांनी प्रतापरावांचे कृषी संस्कृतीशी जुळलेली नाळ सांगितली. प्रतापरावांचे स्वागत करत मलकापूर ते सोलापूर रेल्वेमार्गाची मागणी आ. धीरज लिंगाडे यांनी केली. गोकुळ शर्मा यांनी प्रतापरावांच्या गतआठवणींना उजाळा देऊन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राधेश्याम चांडक यांनी प्रथम प्रतापरावांचे स्वागत करत शिक्षणक्षेत्राची दुरवस्था नमूद करून जागतिक किर्तीचे लोणार सरोवर व ऐतिहासिक ठेवा सिंदखेडराजा या पर्यटन स्थळाच्या भरभराटीची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात आ. संजय गायकवाड यांनी प्रतापरावांच्या विजयाची परंपरा सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या प्रयत्नातून होत असलेल्या जनविकास कामांना आता अधिकाधिक गती प्राप्त होईल, हा ठाम विश्वास व्यक्त करत असतानाच, बुलढाणा शहर व मतदारसंघात चालू असलेल्या कामांची माहिती देत प्रतापरावांचा हा नागरी सत्कार बुलढाणेकरांसाठी आनंदाची पर्वणी असल्याचे सांगितले.
ना. प्रतापराव जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा शिवसेनेत काम सुरू केले, तेव्हा शिवसेना सत्तेत येईल, असा विचारही केला नव्हता. ८० टक्के समाजकारण शिवसेनेचे मूळ सूत्र, त्यामुळे आमदार-खासदार- मंत्री होऊ.. असं स्वप्नातही वाटत नव्हते, अपेक्षा नव्हती पण काम करत होतो. आधी आमदार म्हणून, पुढे मंत्री, खासदार व आता केंद्रीय मंत्री जनहिताच्याच कामाला प्राधान्य दिले. अटलजींच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यात पैनगंगा- नळगंगा ते पैनगंगा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रकल्प आलातर शेतकरी संपन्न होईल. भक्तीमार्गाला विरोध आहे, हे ठीक असलेतरी मात्र कोणताही विकास पाहिजे असल्यास अंत:करण उदार ठेवण्याची भूमिका हवी. सिंदखेडराजा व लोणार विकास आराखड्यातील उर्वरित निधी खेचून आणू, आयुर्वेद रुग्णालय जिल्ह्यात येत आहे. खूप संकल्पना आहे, त्यामुळे विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करू.. अशी भूमिका प्रतापरावांनी व्यक्त करत या नागरी सत्कार सोहळ्यात जिव्हाळा असल्यामुळे तो अभूतपूर्व झाला, अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती, चंद्रशेखर जोशी यांनी केले. नंतर सत्कार समितीच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे सत्कार डॉ. गजानन पडघान, डॉ. राजेश्वर उबरहंडे, नीलेश भुतडा, श्रीकांत गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, अरविंद होंडे, मंदार बाहेकर, मोहन पर्हाड, प्रा.अनिल रिंढे, प्रा. अमोल वानखडे, गुलाबराव कडाळे, डॉ. दुर्गासिंह जाधव, प्रा. सुनील जवंजाळ, डॉ. गायत्री सावजी, सौ. स्मिता चेकटकर, सौ. वैशाली ठाकरे, सिद्धार्थ शर्मा, सुनील देशमुख, तुषार सावजी, युवराज वाघ, मोहन पवार, अरुण जैन, नितीन शिरसाट आदींनी केले.
नागरी सत्कार समितीच्यावतीने मंत्री महोदयांना दिलेली ‘बैलगाडी’ भेट ‘लक्षवेधी’ ठरली. कार्यक्रमाची सुरुवात क्षीतिज निकम व ज्ञानदा काळे यांच्या योगाने झाली. मानपत्र प्रदान करून घेताना त्यांच्या ऑडिओ अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. नंतर विविध संस्था व संघटना तथा नागरिकांच्यावतीने प्रतापरावांचा सत्कार तासभर चालला. अगदी व्यवस्थित, नियोजनबद्ध हा नागरी सत्कार सोहळा ठरला, तो बुलढाणा शहरासाठी अभूतपूर्व तेवढाच जिल्ह्यासाठी पथदर्शक !
————